February 7, 2026 3:58 pm

शिवसेना जिल्हाप्रमुख घरकुल लाभार्थ्यांसह धडकले पं. स. वर‎

बीडीओंना धारेवर धरले अन् लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा

दर्यापूर : घरकुल योजनांचा दुसरा हप्ता विविध कारणे पुढे करून रोखत लाभार्थींना त्रस्त करणाऱ्या दर्यापूर पंचायत समितीच्या बीडीओंना शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांनी सोमवारी धारेवर धरले. तसेच त्यांनी घरकुल लाभार्थींच्या समस्या तत्काळ सोडवल्या नाही तर अधिकाऱ्यांना उलटे टांगण्याची धमकी दिली. शिवसेना पदाधिकारी व लाभार्थींचा आक्रमक पवित्रा बघून पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी कामाला लागले. परिणामी लाभार्थींच्या खात्यात दुसरा हप्ता अवघ्या काही तासांत जमा झाला.
                         केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयानुसार पं. स. द्वारे तालुक्यातील सर्वच गावात मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबवण्यात येत आहे. यात लाभार्थ्यांना प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे  बँक खाते, आधार लिंक नाही, त्यामुळे त्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांसमक्षच तातडीने काहींना हप्ते टाकण्यात आले.

हप्ते देण्यासाठी पैसे घेतात

                       “टप्प्याटप्प्याने अनुदान वितरण प्रक्रिया सुरू आहे. विविध योजनेतील लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास थेट पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच लाभ मिळण्यासाठी पैशांची देवाण-घेवाण करू नये.” – कालीदास तापी, बीडीओ, पं. स. दर्यापूर
                        “गाव-खेड्यातील गोरगरीब, अपंग घरकूल योजनांचा लाभ मिळण्यासाठी पंचायत समितीत चकरा मारून त्रस्त झाले आहेत. घरकुल विभागातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी लाभार्थ्यांकडून पैसे घेत आहेत. हा प्रकार संतापजनक असून, या गंभीर प्रकाराकडे बीडीओ डोळेझाक करत असल्याचे दिसते.” – गोपाल अरबट, जिल्हाप्रमुख, शिवसेना.


0
0

Leave a Reply

Realted News