नागपूर : संत शिरोमणी श्री सेनाजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव, ‘विठ्ठल रुख्मिणी मंदिर’ तेलगाव कामठी येथे, आज मोठया भक्तीभावाने उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तेलगाव कामठी व्दारा आयोजीत पुण्यतिथी महोत्सवात आज गुरुवारला सकाळी ११.०० वाजता श्रींच्या मूर्तीचा अभिषेकानंतर किर्तन, दहीकाला, आरती व महाप्रसादासह कार्यक्रम साजरा करण्यात आला.
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेनाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात मुख्य अतिथी महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, वैभव तुरक, विनेश कावळे, धरम अतकरे, अशोक सूर्यवंशी, रविंद्र नक्षणे, नितीन पांडे, प्रवीण निंबाळकर, तुषार मिराशे, प्रफुल अनकर, पंकज कडु, सचिन पापडकर प्रामुख्याने उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा मिराशे, योगेश कापसे, निलेश मांडवकर, मनोज कडवे, किशोर मिराशे, राजु लाडेकर, हरिष शिराळकर, मीनाक्षी मिराशे, रंजना लाडेकर, डिंपल मिराशे व विभागीय पुरुष व महिला पदाधिकार्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला तसेच समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
‘संतश्रेष्ठ सेवामूर्ती संत सेना महाराज जीवन आणि कार्य!’
लेखक : माणिकदास बेलूरकर, संत साहित्य अभ्यासक
‘महाराष्ट्र संतकवी परंपरा ! तैसाची चरित्र ग्रंथाचा पसारा !!
वळणी लावाया समाज सारा ! ग्रंथ लिहिले बहुतांनी !!’
ग्रामगीता महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभली आहे.माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत रोहिदास महाराज, संत चोखा महाराज यांच्या सारखे शेंकडों संत होऊन गेले असून, आज माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांना समाधिस्थ होऊन ७५० वर्ष इतिहासाप्रमाणे होत आहे. ज्ञानेश्वरादी भावंडांचे वडिल विठ्ठलपंत आणि सेनापती हे आचार्य स्वामी रामानंदाचे शिष्य होते. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक संत मंडळी श्रीसंत सेनाजींना काका म्हणून संबोधित असत. या सर्व संत साहित्याचे संशोधन माझे पिताश्री संतचरित्रकार पूज्य श्री रामकृष्णदादा बेलूरकर यांनी करून ठेवले आहे.
परंतू संत महापुरूषांना वर्षे, जन्म, मुत्यू, जात, धर्म, पंथ, पक्ष यांच्या पलिकडचे त्यांचे जीवन असते. संत सेना महाराज त्यापैकी एक. त्यांचा जन्म इ.स. शके १२३३ वैशाख वद्य १२ रविवारी विक्रम संवत. १३५७ मध्ये तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधवगड (मध्यप्रदेश) मध्ये पिताश्री देवीदास व मातोश्री प्रेम कुंवरबाई यांच्या पोटी झाला. संत सेना महाराज यांनी जीवनभर पंढरपूरची वारी सोडली नाही. त्यासाठी ते सदैव तत्पर असायचे. संत दर्शन, संत सेवा त्यांच्या जीवनातील मुख्य पैलू होता. त्यांनी जी साहित्य रचना साधारण २६३ अभंग आणि काव्य संग्रह प्रकाशित आहे. त्यामध्ये मारवाडी, राजस्थानी भाषेत भगवान पांडुरंगाची, संत नामदेवाची आरती लिहून ठेवली आहे.
संत सेना महाराज यांनी ‘स्वच्छता, समता, बंधुत्वता ! हे तीन गूण मानवतेच्या कल्याणासाठी जीवनभर जनसामान्यांचे हृदयांत बसले आहे. एका अभंगात ते लिहितात “नाही भाव अंगी ! भूषण मिरवितो जगी! स्थिर नाही मन!सदा कुविषयाचे ध्यान! सेना म्हणे अपराधी ! सांभाळावे कृपा निधी!!” आपल्याला मिळालेला कृपाप्रसादामूळे आपण भारतीय लोक आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करीत आहोत. याला कारण भगवान पांडुरंगाच्या कृपेने आपण सर्व लोक जीवन नौका सांभाळित आहोत. त्यामूळेच संपूर्ण भारतीय लोक आपली पंढरीची वारी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला चुकू देत नाही. हा संत सेना महाराजांनी दिलेला कृपा निधी संदेश होय.
एकदाची गोष्ट सांगतोय. राजा विरसिहं यांची कटिंग दाढी खुप वाढून गेली होती. राजाने संत सेना महाराजांकडे खुप निरोपावर निरोप पाठविले. परंतू घरी संत सज्जन आल्याने, संत शिरोमणी सेना महाराज राजांच्या सेवेसाठी वेळेवर पोहोचू शकले नाही. अशा वेळी स्वतः साक्षात भगवान पांडुरंगाने राजा विरसिहं यांच्या दरबारात जावून राजाची सेवा केली. राजा भयंकर खुश झाला. संपूर्ण घरची कामे आटोपून संत सेना महाराज जेव्हा राजा विरसिंह यांच्या सेवेत दाखल झाले. त्यावेळी राजा विरसिहं उद्गगारले आताच तर तू येवून गेला. आता पुन्हा कशाला आला, यावरून संत सेना महाराजांनी ओळखले. नक्कीच भगवान पांडुरंगाने ही सेवा दिली. असे मनात पुटपुटतं असतांनाच राजा विरसिहं यांनी अनेक मोहरा, सोनं, चांदी अशी अनेक नाणी दिली. त्यावरून संत सेना महाराज घरी जाता बरोबर भगवान पांडुरंगाच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला आणि किती दिवस असे उपकार कराल देवा.
संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे “तुका म्हणे त्याचे व्हारे, देव तुमच्या मरणी मरे!” पूढे श्रावण वद्य १२ शके १९९२- इ.स. १३७० रोजी संत सेना महाराज समाधीस्त झाल्यावर बांधवगड मध्यप्रदेश येथे राजा विरसिहं यांनी त्यांची स्वतःच्या खर्चातून समाधी मंदिर बांधले. “माझे झाले स्वहित! तुम्हा सांगतो निश्चीत! करा हरिचे चिंतन! गांवे उत्तम हे गूण! श्रावण वद्य द्वादशी!! सेना समाधीस्त त्या दिवशी!!”आज संपूर्ण भारतभर विविध राज्यांतील सद्भक्त, समाज बांधव त्यांची जयंती आणि पुण्यतिथी महोत्सव साजरा करतात. संत हे कुठल्याही एका जातींचे नसतात. आपण मानवाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना आपली जात लावली. जेणेकरून आपल्याला त्या संत महापुरुषांच्या संस्थानातील कुठे पदांवर जाता येईल, मोठी जात असेल तर राजकीय क्षेत्रात उभे राहता येईल, त्यांच्या नावावर संस्थान, संतांचे नावे महामंडळ स्थापन करून तिथे पद मिळवून आम्ही त्यांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्याचं कुळातील हे सांगून शासन दरबारी काही मागता येईल.
परंतू खरे संत गाडगेबाबा किंवा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जातीची गावात एक दोन घरं असतील. परंतू त्यांनी कधीही आपल्या कुटुंबातील माणसे साधी धर्मशाळेत किंवा आश्रमात मुक्कामी सुध्दा राहू दिली नाही. जातीय भिंती-धर्माच्या भिंती तिथेच मोडून काढल्या आणि सर्वत्र मानवतेचे बीजारोपण केले. आज त्यांची विचारधारा संपूर्ण जगाने मान्य केली आहे. याला कारण ‘सेवा’ हे होय. “जो सेवांची मानतो धन! काही अपेक्षा न ठेवोण! तो शेवटी झाला भगवान! लोक पुजू लागले घरोघरी!! सेवेने अंगी सामर्थ्य येते! जे जे बोलाल ते ते होते ! हस्ते परहस्ते होते काम त्यांचे!!” ग्रामगीता अध्याय २४ वा सेवा सामर्थ्य “भजन कसाई, रविदास चांभार! सेना, संताजी गोरा कुंभार ! कृष्णदयार्णव, वामन, श्रीधर !संत कविही!! अशा प्रकारचा उल्लेख केला गेला आहे.
आज सर्वच क्षेत्रांतील लोकांनी या संत महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी करणे, त्यांच्या जीवन कार्याचें चितंन, मनन, अभ्यास करणे. गरजेचे आहे.