प्रशासन कुभकर्णी झोपेत, नागरिकांच्या मागणीकडे कानाडोळा
का टा वृत्तसेवा : विजय नागपुरे
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील अंतर्गत व छोट्या मार्गावर असलेल्या नदी-नाल्यांवरील बहुतांश पुलांचे संरक्षक कठडे पूर्णपणे, अर्धवट तुटलेले किंवा पुर्णतः गायब झालेले आहेत. पूल व रोड आधीच अरुंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशात चालकांना पुलांचे काठं व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे वाहने नदी-नाल्यांमध्ये कोसळून मोठे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
या पुलांना लोखंडी संरक्षक कठडे लावण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली आहे. परंतु संबंधित अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या ध्यानात ही बाब येतंच् नाही. ही अत्यंत दुर्देवाची बाब आहे. प्रशासनाला जीवघेण्या अपघाताची प्रतीक्षा आहे का? असा आरोप नागरिकांनी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील रोडची नियमित देखभाल व दुरूस्ती तर इतिहासजमा झाली आहे. रस्ता अपघातात वाहनांच्या धडकेने तुटलेले पुलांचे लोखंडी कठडे कबाडी चोरांनी चोरून
नेले, तरी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारात फरकच् पडंत् नाही किंवा कोणतीही कारवाई होत नसल्याची संतापजनक माहीती प्राप्त झाली आहे. ज्याचे परिणाम नागरिकांचे जीव जाण्यात होत आहे.
कळमेश्वर-मोहपा मार्गावर तसेच व बोरगाव (खु.) शिवारातील सप्तधारा नदीवर पुलांचे बांधकाम करण्यात आले. या दोन्ही पुलांचे संरक्षक कठडे मागील काही वर्षापासून पूर्णपणे तुटलेले आहेत. हे दोन्ही मार्ग अरुंद असून, त्यावर बऱ्यापैकी रहदारी आहे. या मार्गावर शेतकऱ्यांची रहदारी सर्वाधिक आहे. संरक्षक कठडे तुटले असल्याने या पुलावरून वाहने थेट नदीत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने संभाव्य धोका गांभिर्याने घेउन या भागातील पुलांना संरक्षक कठडे विनाविलंब लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
