February 7, 2026 6:01 pm

वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारेसह दोन आरोपी फरार

शालार्थ आयडी घोटाळ्यात 2700 शिक्षक, मुख्याध्यापकांची यादी तयार

बोगस नियुक्ती झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार

६०० वर शिक्षकांचे रेकाॅर्ड गहाळ असल्याची माहिती

का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
नागपूर : “शालार्थ आयडी’ घोटाळ्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून शाळेत शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवरही कारवाईला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी २७०० शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालकांची यादी तयार असून ६०० वर शिक्षकांचे रेकाॅर्ड गहाळ असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. शालार्थ आयडी घाेटाळ्यात कारवाईचा फास आवळत चालल्याने शिक्षण संस्थाचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
                      कळमेश्वर (नागपूर) तालुक्यातील धापेवाडा येथील  विठ्ठल-रुक्मिणी प्राथमिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व संचालक दिलीप धोटे याला या प्रकरणात अटक केली आहे. धोटेनंतर आणखी सुमारे ३० शिक्षण संस्थाचालक एसआयटीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.

वाघमारेला लवकरच अटक, पत्नीचीही केली चौकशी

                          शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी, वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे दीड महिन्यापासून फरार आहे. त्याची चारही बाजूंनी कोंडी झाली. अटक होण्याची शक्यता वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघमारेची पत्नी मेघा नायब तहसीलदार आहे. पत्नीसह त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. बँक खाती गोठवली आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयाने वाघमारेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तत्पूर्वीच त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयानेही दिलासा देण्यास नकार दिला हे. शिक्षण विभागाने त्याला निलंबित केले आहे. वाघमारे त्याच्याशी संबंधितांशी व्हाॅट्सॲप काॅलिंगवर संपर्क साधत आहे. त्याचे काही मित्र त्याला नवनवीन सिमकार्ड पुरवत आहेत. त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस होण्यास वेळ लागत आहे. मात्र पोलिस लवकरच त्याच्यापर्यत पोहोचतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

बोगस शिक्षक भरतीचा कारभार २०१२ पासून सुरू

                        बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये पोलिसांनी आत्तापर्यंत शिक्षण विभागातील अटक/ताब्यात घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या १६ पर्यंत पोहोचलेली आहे. बोगस शिक्षक भरतीचा कारभार २०१२ पासून सुरू होता. तेव्हापासून जवळपास १ हजार शिक्षकांना नागपूर जिल्ह्यात नियुक्त्या देण्यात आल्या असून त्यापैकी केवळ ३५० नियुक्त्या रीतसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याचे समोर आले आहे. वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारेसह दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

जवळपास १ हजार शिक्षकांना नागपूर जिल्ह्यात नियुक्त्या देण्यात आल्या

                         शालार्थ आयडी प्रकरणात नियुक्त्या झालेल्या बोगस शिक्षकांच्या नियुक्ती तारखेपासून बॅक डेटमध्ये पगार काढण्यात आले. हे पगार आणि एरिअर्स लाखोच्या घरात आहे. त्यातून वाघमारेसह संबंधित शिक्षण संस्थाचालकांनी एकरकमी आपापले पैसे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात बोगस नियुक्ती झालेल्या शिक्षकांच्याही नोकऱ्या जाणार असल्याने त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये पोलिसांनी संस्थाचालकाला ताब्यात घेतल्याने इतर संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वी चरण नारायण चेटूले या संस्थाचालकाला अटक केली होती. आता काही बोगस मुख्याध्यापक आणि संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर आलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

0
0

Realted News