सेवेचे सोंग उभे केले । आपले स्तुतिपाठक घुसविले ।
मित्रांनो आज जग झपाटून बदलत आहे. माझा चार वर्षाचा नातू अन्मय मृण्मयी अनंता रक्षक असे प्रश्न विचारतो ज्याचे उत्तर तुमच्या कुठल्याच डिक्शनरीत नसते. ग्रंथ-पोथ्यांमध्ये पण ते नसते. नाजूक नात्याला सहज निरूत्तर करते. सध्या व्हाटसप युनिव्हर्सिटीत तत्वज्ञान पेरणा:यांची संख्या वाढत आहे. त्यांचे होमवर्क मात्र शुन्य असते. माझ्या गुरूदेव सेवा मंडळाच्या चळवळीत अर्धे हळकंड खुप भेटतात. पण प्रत्यक्ष भेटीत त्यांच्याकडे कुठल्याच प्रश्नाचे उत्तरे नसतात. इथपर्यंत ते तुमच्या नजरेला नजर मिळवत नाही. अशांना आपण डिलीट करायचे योग्यवेळी समज देत. वायफळ चर्चा मानव हिताचे काम करणा:यांना नको असते. आपल्या सत्यतेवर मात्र आपला विश्वास असावा. संत तुकाराम महाराज म्हणतात :-
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही । मानीयले नाही बहुमता ॥
सत्य विचारांची माणस संघटीत नसतात. पण विकृत विचारसरणी संघटीत असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून विचार मांडतांना-
सेवेचे सोंग उभे केले । आपले स्तुतिपाठक घुसविले ।
वाईट झाले ते ते माथी मारले । ख:या सेवकांच्या ॥ 14॥ग्रा.अ.10
हे आम्ही उघड्या डोळ्यानी पाहात आंधळेपणाचे सोंग घेतो.
नथीतून जैसा मारावा तीर । तैसे असती बहादूर ।
परि गाव केला चकनाचूर । द्वैत पाडोनि ॥ 15॥ ग्रा. अ. 10
गावच नाही तर या बदमाशांनी अनेक चळवळी, अनेक संस्था नासवल्या. सत्तेची लालसा, खोट्या प्रतिष्ठेची हाव, हरामाचे पैसे तसेच मी अमूक पदांवर हा खोटेपणा मिरविणारे, या प्रवृतीची संख्या सर्वत्र वाढत आहे. या प्रवृत्तींना थांबवणे सज्जनांची जवाबदारी आहे.
नाना त:हेचे वाद वितंड । नाना पक्षांचे माजविले बंड ।
कधी आड, कधी उघड । सुरू झाले कार्य त्यांचे ॥ 16॥ ग्रा.अ.10
गोंधळवोनि टाकिले जनमना । झाला प्रेम -शक्तिचा धिंगाणा ।
जिकडे पाहावे तिकडे कल्पना । फुटीर वृत्तिच्या ॥ 17॥ ग्रा.अ.10
आज सर्वत्र हा फुटीर वृत्तीच्या शक्तिचा धिंगाणा वाढतो आहे. समाजकारण, राजकारण, सत्ताकारण तसेच भ्रष्टाचाराचा हैदोस कोण थांबवणार?
काही सज्जनांनी गाव जमविले । काही गुंडानी गाव नाशवीले ।
नाना त:हेचे तमाशे झाले । गावी आमुच्या ॥ 18॥ ग्रा.अ. 10
गुंडप्रवृत्ती ही गावातच नाही तर सेवेचे सोंग घेतलेल्या सत्तेतही दिसते. संघटीतरीत्या त्यांचा कब्जा सत्तेवर असतो. भलेही संत महापुरूषांच्या विचारांची चळवळ असो. सत्ताधारी संतविचारांची पायमली करतात.
व्यक्तिस्वार्थ बोकाळला । जो तो मनाचा राजा झाला ।
वेगवेगळ्या प्रलोभनी गुंतला । समाज सारा ॥ 19॥ ग्रा.अ. 10

समाज माध्यमांवर चर्चा करणा:यांनी आपल्यातली सत्यता जनलोकांसमोर येऊन जाहीररित्या प्रगट करावी. चर्चेत सहभागी व्हावे. तरच तुमचा सेवेचा, विचारांचा दिखावा खरा ठरेल. सत्याची हिंम्मत ही मोठी असते. वाचा संत-महापुरूषांचे जीवन, स्वता परीवर्तन स्वीकारा लोक तुमचे अनुकरण करतील.
आज जाती-धर्माचे स्तोम, यातून मानवी मन दुभंगत आहे. देश सुखाने नांदावा की भांडणातून विस्कळीत होऊन विदेशी गुलामगीरीकडे पुन्हा जावा? पाकिस्तान हे दुखणे मिनटात संपणारे आहे. पण देशाअंतर्गत गद्दारांचे काय? जी भारतीय लोकशाही भ्रष्ट्राचार, दुराचार, अंधश्रद्धा, अंधरूढ्यांना कवटाळत देशाच्या प्रगतीच्या फक्त बाता करते. भारतीय तरूण विदेशी नोकरी आणि विदेशी संस्कृतीला कवटाळतो आहे. तरूणपीढीतील विवाह संस्था, लग्न समारंभाचा श्रीमंत दिखावा दोन घटके नंतरचा मोठा ब्रेकअप आहे. प्रेमातले अनंत ब्रेकअप आता वैवाहीक जीवनात दिसत आहे. कौटुंबीक न्यायालयात विभक्त होणा:यांच्या रांगा सपाटून वाढत आहे. तरी आमच्या संस्कृतीच्या गप्पा, विश्वगुरू असल्याचे खोटारडे स्वप्न पाहात आपलीच पाठ आपणच थोपटतो. हे कुठल्या प्रगत देशाचे लक्षण आहे?
![]()
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साठ वर्षाआधी भारताचे दु:खने लिहतात :-‘मित्रांनो! धर्म हा मेल्यावर मोक्ष मिळेल म्हणून आचारावयाचा नसतो; तर देश स्वातंत्र्यानी नटविण्याकरीता, जीवनात आदर्शता आणण्याकरिता आणि समाजाची धारणा टिकविण्याकरीता तो असतो.’ ‘सत्याने जगणे – विश्वबंधुत्वाने नांदणे हाच एकमेव धर्म असून, गटबाजी निर्मूलन मूठभर लोकांसाठी जगाची धूळधाण करणे व असत्याने शिरजोरी दाखवणे हाच अधर्म आहे.’
‘आता सांगण्या – ऐकण्याचे दिवस राहिले नाहीत, तर प्रत्यक्ष कृती करून दाखविण्याची ही आणीबाणीची वेळ आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सारे जग दु:खाने होरळपत असता, घराघरांतील लोक उपवासाने तडफडत असता, ब्रम्हज्ञानाची कथाकीर्तने करीत फिरणे ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे… परिस्थितीकडे लक्ष न देता सानातन धर्माच्या नावाखाली यज्ञयाग आदी करायला लावणारे, आज देशाचे शत्रू समजले पाहिजेत.’
वरील सर्व विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील आहे.
श्रमीक, कष्टीक बहुजन समाज स्वाभीमानाने जगावा. स्वातंत्र्य, ममता, समता, न्याय, बंधुता या तत्वाने भारत सुखी व्हावा. हा प्रयोग प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनात उतरवायला हवा. पण जे स्वत:ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे वारसदार समजतात. त्यांच्या जगण्यातून हे विचार दिसावे. जर हे त्यांना जमत नसेल तर त्यांनी श्रीगुरूदेव चळवळीची नाड तोडून टाकावी. गुरूदेवांचा, राष्ट्रसंतांचा तोंडाने नामजप करायचा कृतीतून वेगळाच विचार पेरायचा. ही बेईमानी थांबायला हवी.
![]()