सर्वांनी जबाबदारीने व सुरक्षिततेने वीज वापर करावा

महावितरणचा संदेश :

‘वीज सुरक्षितता हीच जीवन सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे’

मोहपा  महावितरण कार्यालयाने राबविला वीज सुरक्षा सप्ताह

काटा वृत्तसेवा : भुषण सवाईकर 
कळमेश्वर : पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी वीज प्रवाह/ वीजतारांच्या स्पर्शाने अनेकांचे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जीवहानी होते. उन्हाळ्याच्या दिवसात वाॅटर कुलर मुळे अनेक लहान मुले, महिला मृत्युमुखी पडतात. तसेच पावसाळ्यात निष्काळजीपणाने किंवा अनवधानाने अनेक वीज अपघाताने बळी पडत असल्याने महाराष्ट्र वीज वितरण कंपनी तर्फे दरवर्षी 1 जून ते 6 जून या कालावधीत ‘वीज सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जातो. यामागील उद्दिष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिक, कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वीज सुरक्षिततेबाबत जनजागृती वाढवणे हा आहे.
मोहपा येथे नागरिकांना वीज सुरक्षेबाबत संपुर्ण सप्ताहात जनजागृती करण्यात आली. मोहपा शहर व ग्रामीण क्षेत्रात उपविभागीय वीज कार्यालयाकडून वीज सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. उपविभागीय अभियंता मिलिंद राणे यांचे नेतृत्वात कनिष्ठ अभियंता अनिल जाने, प्रफुल्ल वाडबुदे यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी सुचना संदेश फलक व प्रत्यक्ष संवाद साधून जनजागृती केली. या जनजागृती मोहिमेत मोहपा वीज कार्यालयाचे सचिन शहारे, स्मिता इंगळे, शुभम शिंदे, आयुष चालकुर, मंगेश चिमोटे, शालिनी टेकाडे, निलेश खोडे, ज्योती मनोरे इ. कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना खालील सूचना देण्यात आल्या..

                       वीज उपकरणे आणि वायरींगची वेळेवर तपासणी करा. जुनी व खराब वायरिंगमुळे शाॅर्ट सर्किट किंवा आगीचे प्रकार होऊ शकतात. ओल्या हाताने विजेची उपकरणे हाताळू नका. शाॅक लागण्याचा धोका वाढतो. तुटलेली वीज तारा, उघड्या वायरिंगपासून दूर राहा. अशा बाबी Mahavitaran कार्यालयास तत्काळ कळवा. मिटरसाठी योग्य अर्थिंग व संरक्षित कव्हर ठेवा. इलेक्ट्रिक पोल किंवा ट्रान्सफॉर्मरच्या खूप जवळ जाऊ नका. लहान मुले व जनावरांनाही दूर ठेवा. इन्व्हर्टर/ UPS वापरताना योग्य वायरिंग व फ्यूज वापरा. सूचना देण्यात आल्या.


ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

‘‘हे करू नये’’

                      तुटलेल्या वीजेच्या तारांना हात लावू नये. त्या ओलांडू नये व इतरांना तसे करू देऊ नये. तुटलेल्या विजेच्या तारेजवळ गुरे-ढोरांना जावू देऊ नये. कोठेही स्वत जास्त क्षमतेचे फ्युज तार टाकू नये. विद्युत सर्किटवर अधिकचा भार टाकू नये. वायर्सना जाॅईंट ठेऊ नये, तारेच्या कुंपणात वीजप्रवाह सोडू नये. ते बेकायदेशीर व धोकादायक आहे. वीजेचा खांब, स्टे वायरला जनावरे बांधू नये. पत्र्याच्या घरात/ दुकानात इ. ठिकाणी धातूला घासेल अशा पद्धतीने वायर वापरू नये. कपडे वाळत घालण्यासाठी वापरण्यात येणारी तार वीजेच्या खांब/ स्टे वायरला बांधू नये. उघडे वाॅटर हिटर वापरू नये.
                      वीजेच्या वाहिन्यांवर हुक/ आकडे टाकून विजेचा वापर करू नये. वीजेच्या वाहिन्यांखालून लांब/ उंच धातूची वस्तू हाताळू नये. वीजेच्या वाहिन्यांखाली/ वाहिन्यांजवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये तसेच झाडे लावू नये. वीज खांबचे अर्थिग वायर्स तसेच स्टे वायर तोडू नये. झाडांमधून सर्विस वायर घेऊन जाऊ नये. शाॅक लागलेल्या व्यक्तीस उघड्या हाताने स्पर्श करू नये किंवा धातूच्या वस्तूने बाजूला करण्याचा प्रयत्न करू नये. त्यासाठी लाकडी कोरड्या दांड्याचा वापर करावा. एका साॅकेटमध्ये अनेक प्लग पिन लावू नये.
लोखंडी वस्तू प्लगमध्ये टाकू देऊ नये. प्लगमधून पीन काढतांना वायरला पकडून हिसका देऊ नये. जमिनीवर पाणी साचलेले असल्यास प्लगमध्ये पीन टाकू नये. विजेच्या वाहिन्यांजवळ पतंग उडवू नये. पतंग काढणे अथवा कोणत्याही कारणासाठी विजेच्या खांबावर चढू नये. विजेच्या वाहिन्यांजवळील झाडांवर चढू नये. विद्युत यंत्रणेतील विजेचे खांब/ रोहित्र इ. उपकरणांजवळ खेळू नये. विजेच्या वाहिन्यांजवळील पत्र्याच्या शेडवर अडकलेला बॉल किंवा खेळणी काढण्यासाठी शेडवर चढू नये. विज पुरवठ्याच्या ठिकाणी झाकण नसलेल्या किंवा तथा जागी हात लावू नये. खाजगी लाईनमनकडून लाईनवरची कामे करवून घेऊ नये. शाॅर्ट सर्किट लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न करू नये.

‘‘हे करावे’’

                        वीज वाहक तार तुटून पडल्याचे नजरेस आल्यास किंवा अपघात घडल्यास महावितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयास घटनेच्या पत्त्यासहित त्वरित माहिती यावी, त्यासाठी टोल फ्री क्र. १८००  -२३३- ३४३५  किंवा  १८००-२१२-३४३५ वर संपर्क साधावा.
आय. एस. आय. दर्जाचीच उपकरणे वापरावीत. वीजेचे अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने घरात/ दुकानात विद्युत संच मांडणीत योग्य क्षमतेच्या इएलसीबी/ एमसीबी/आरसीबीचा वापर करावा. विद्युत मांडणीचे अर्थिग कार्यक्षम ठेवावे व अर्थिग केलेली जागा ओलसर ठेवावी. थ्री पीन प्लगचीच वीजेची उपकरणे वापरावी. त्यामुळे अर्थिग व्यवस्थित मिळेल. प्लग, पीन, बटन बोर्ड यांना तडे जातात, असे दिसल्यास ते त्वरित बदलावे. वीजेची बटने, प्लग-पीन मुलांच्या हातात येऊ नयेत, अशा उंचीवर फिक्स करावीत.
                          जोड नसलेले वायर वापरावे. विद्युत वायरिंग मान्यताप्राप्त ठेकेदाराकडूनच करून घ्यावी तसेच ती नियमितपणे तपासून घ्यावी. घरातील / दुकानातील वीजेची कामे प्रशिक्षित व्यक्तिंकडूनच करून घ्यावीत. पंखे, इस्त्री, कुलर वापरताना त्यात करंट उतरू शकतो, याची जाणीव ठेवावी व ती सावधानतेने हाताळावी. हेयर ड्रायर, मोबाईल चार्जर यासारख्या वस्तूंचा वापर नसताना पीन प्लग मधून काढून ठेवावी.
                          प्लग पीन बसवतांना योग्य काळजी घ्यावी. वीजेच्या वाहिन्यांखालून तसेच गॅलरीत किंवा गच्चीवर धातूची वस्तू हाताळतांना वाहिन्यांपासून वस्तू दूर राहील याची काळजी घ्यावी. वीजेच्या वाहिन्यांजवळील झाडाच्या फांद्या तोडण्यापूर्वी कंपनीच्या अधिकार्यास कळवून वीजपुरवठा बंद करून घेण्यात यावा. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करावा. विद्युत सुरक्षेचे नियम पाला, वीज अपघात टाळा. टोल फ्री क्रमाक: १८००-२१२-३४३५


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News