♦ आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते सावनेर येथे पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप
सावनेर :आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते आज 24 मार्चला नगर परिषद, सावनेर येथे गोरगरीब जनतेला पट्टे वाटप करण्यात आले. यात 45 लाभार्थ्यांचा समावेश आहे. सोबतच, दिव्यांग लोकांना नगरपरिषदेच्या उत्पन्नाच्या 5 टक्के निधीचे धनादेश वाटप आणि काही महिला बचत गटांना धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी आमदार देशमुख यांनी सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करून आपले मनोगत व्यक्त केले.
ते म्हणाले, “आज खरोखरच खूप आनंदाचा दिवस आहे. कित्येक वर्षांपासून गोरगरीब जनता स्वतःची जागा नसल्याने अतिक्रमण करून, हालअपेष्टा सहन करून वास्तव्य करत होती. स्वतःच्या जागेवर घर नसल्याने कधीही प्रशासनाची कारवाई होऊ शकते, अशी त्यांना भीती असायची. पण आता त्यांना शासनाकडून स्वमालकीचे जागेचे पट्टे मिळाले आहेत आणि लवकरच या सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेमधून स्वतःच्या मालकीचे घर पण मिळणार आहे. झूडपी जंगल प्रकरणे निकाली लावून आणखी जास्तीत जास्त घरांसाठी जागा मिळवून देऊ. मी तुमच्या सर्वांच्या घरांच्या वास्तूपूजनाला नक्की येईन असंही ते म्हणाले . नदीच्या पुरामुळे जी जागा वास्तव्यास ठीक नाही अशा रहिवाशांना शासनाच्या नियमानुसार सुरक्षित ठिकाणी पट्टे वाटप करू.”
या प्रसंगी ॲड. अरविंद लोधी, रामराम मोवाडे, मंदार मंगळे, मनोहर कुंभारे, बिडीओ संपत लखाटे, मुख्याधिकारी बगडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.