डिफेन्स कॉरिडॉरसाठी नऊ गावांतील शेतकरी सकारात्मक; वाढीव मोबदला मिळाल्यास जमीन देण्याची तयारी!
आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्याशी शेतकऱ्यांचा थेट संवाद; हजारो रोजगारांच्या संधींसह कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रयत्न
सावनेर : सावनेर तालुक्यातील नऊ गावांमध्ये प्रस्तावित डिफेन्स कॉरिडॉर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर जमीन संपादन प्रक्रियेला गती मिळत असून, योग्य व वाढीव मोबदला मिळाल्यास जमीन देण्यास शंभर टक्के तयार असल्याची ग्वाही नऊ गावांतील शेतकऱ्यांनी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांना दिली. प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी आयोजित थेट संवादात त्यांनी ही सकारात्मक भूमिका मांडली.
माळेगाव, जोगा, खुर्सापार, जैतपूर, छत्रापूर, सालई, नांदामोमुख, सावळी मोहतकर आणि जटामखोरा या गावांतील शेतकऱ्यांशी आमदार देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी संभाव्य मोबदल्याची माहिती देताना कोरडवाहू जमिनीसाठी एकरी ३० ते ३२ लाख, हंगामी बागायतीसाठी ४५ ते ४७ लाख, तर बागायती जमिनीसाठी ६४ ते ६५ लाख रुपये मोबदला मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. तसेच झाडे, विहिरी, मोटारपंप व इतर मालमत्तेचे स्वतंत्र मूल्यांकन करून मोबदला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जमिनीचे संयुक्त मोजमाप (जे.एम.आर.) पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. सर्व मोबदला एकाच वेळी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आमदार डॉ. आशिषराव देशमुख म्हणाले, “शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक मोबदला मिळालाच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनातही सहभागी होईन. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.”
डिफेन्स कॉरिडॉरमुळे परिसरात हजारो स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असून, खतनिर्मिती प्रकल्पासारख्या उद्योगांमुळे औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. स्थानिक तरुणांना या रोजगारासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आदिवासी बांधवांनीही आपल्या समस्या मांडल्या. योग्य व वाढीव मोबदला, पारदर्शक प्रक्रिया, सर्वांना समान न्याय आणि स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या. उपस्थितांनी या लोकहितकारी प्रकल्पाचे स्वागत करत आमदार डॉ. देशमुख यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.
या संवादावेळी आमदार राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार डहाट, दिगंबर सुरतकर यांच्यासह नऊही गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







