लिबरल नेते मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान
वृत्तसंस्था, टोरंटो : बँक ऑफ कॅनडाचे माजी प्रमुख आणि लिबरल पार्टीचे नेते मार्क कार्नी कॅनडाच्या यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारतील. टुडो यांनी जानेवारीमध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा जाहीर केला होता, परंतु नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान या नात्याने काम पाहिले. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कार्नी यांच्याकडून लवकरच सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या धोरणांना ठाम विरोध
५९ वर्षीय कार्नी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार या नात्याने ८५.९ टक्के एवढी विक्रमी मतेमिळाल्यानंतर लिबरल पार्टीतर्फे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘अमेरिकेने लागू केलेल्या वाढीव आयातशुल्कास ठोस प्रत्युत्तर देत त्यांच्या वस्तूंवरही तेवढाच आयातकर आकारण्याचे धोरण कायम राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कॅनडा हे आमचे ५१ वे राज्य होईल, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी घोषणेसदेखील त्यांनी ठाम विरोध दर्शवला. ‘अमेरिकेने आमच्यासोबत जो संघर्ष सुरू केला आहे तो आम्हाला नको होता. परंतु, आपल्यावर हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्यास कॅनडाचे नागरिक नेहमीच तयार असतात. अमेरिकेने गाफील राहू नये, शेवटी विजय आमचाच होणार आहे,’ असे ते म्हणाले.