February 7, 2026 4:06 am

७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा

कर्तव्य पथावर शक्तीचे भव्य प्रदर्शन; अटारी सीमेवर देशभक्तीचा जोश

नवी दिल्ली / अमृतसर :भारताने 26 जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर आयोजित भव्य संचलनात भारताच्या लष्करी सामर्थ्याबरोबरच सांस्कृतिक वैविध्याचे प्रभावी दर्शन घडले. यंदाच्या परेडची संकल्पना ‘स्वातंत्र्याचा मंत्र – वंदे मातरम्’ अशी होती.

यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडला प्रथमच दोन प्रमुख पाहुणे उपस्थित होते. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली.

परेडमध्ये एकूण ६,०६५ सहभागी होते. लष्करी मार्चिंग तुकड्यांसोबतच विशेष दल, पशु पथक आणि विविध सुरक्षा दलांच्या युनिट्सनी संचलनात भाग घेतला. फ्लाय-पास्टमध्ये २९ विमाने सहभागी झाली असून त्यात १६ लढाऊ विमाने, ४ वाहतूक विमाने आणि ९ हेलिकॉप्टर यांचा समावेश होता. ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरचे प्रहार प्रात्यक्षिक तसेच भीष्म आणि अर्जुन रणगाड्यांची गर्जना विशेष आकर्षण ठरली.

देशभरातून आलेल्या २,५०० कलाकारांनी विविध राज्यांचे लोकनृत्य, संगीत आणि संस्कृती सादर करत भारताच्या एकतेचे दर्शन घडवले. यावेळी काही ऐतिहासिक क्षणही अनुभवायला मिळाले. संपूर्ण पुरुष सीआरपीएफ तुकडीचे नेतृत्व महिला अधिकाऱ्याने केले, प्राण्यांच्या तुकडीचा सहभाग झाला आणि सैन्याच्या युद्ध मॉडेलचे थेट प्रात्यक्षिक प्रथमच सादर करण्यात आले.

दरम्यान, अमृतसर येथील अटारी सीमेवर प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडलेल्या रिट्रीट सेरेमनीत देशभक्तीचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. भारत माता की जय आणि वंदे मातरम्च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भारतीय जवानांनी बाईकवर पिरॅमिड तयार करत साहसी कसरती सादर केल्या. आर्मी डॉग्स आणि लहान मुलांच्या कसरतींनी प्रेक्षकांची मने जिंकली.

ढोलाच्या तालावर युवक-युवतींनी भांगडा सादर केला. बीएसएफच्या जवानांनी पूर्ण शिस्तीत परेड केली, तर निहंगांनीही पारंपरिक कसरती दाखवल्या. मात्र ऑपरेशन ‘सिंदूर’मुळे यंदा भारत-पाक सीमेवर ना गेट उघडण्यात आले, ना मिठाईची देवाणघेवाण झाली.

अटारी सीमेवर रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी लोकांची गर्दी
अटारी सीमेवर रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी लोकांची गर्दी

सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवण्यात आला आणि रिट्रीट सेरेमनीचा समारोप झाला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव जोशात साजरा केला.

0
0

Leave a Reply

Realted News