मुंबई : विडंबन गीतातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे स्टँडप काॅमेडियन कुणाल कामरा व उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर बुधवारी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. सभापती राम शिंदे यांनी तो विशेष अधिकार समितीकडे पाठवला आहे.
उद्धवसेनेने कुणालची पाठराखण केली. त्यामुळे या दोघांविरोधात हक्कभंग मांडण्यात आला आहे. कामराने उपमुख्यमंत्र्यांबाबत अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. उद्धवसेनेच्या नेत्यांनी समाजमाध्यमांवर संबंधित कविता पुन्हा टीकात्मक आविर्भावात गाऊन दाखवत उपरोधिक भाष्य केले. त्यामुळे सभागृहासह दोन्ही सभागृहातील सदस्यांचा अवमान झाल्याचा आरोप आमदार दरेकर यांनी केला आहे.
त्यांचा अपमान होईल अशी शिवीगाळ केली आहे का? : अंधारे
हक्कभंग आणण्यासारखं कोणतं बीभत्स कृत्य मी केले आहे ? मी सभागृहात कोणाला ५६ जण पायाला बांधून ठेवते अशी भाषा केली आहे का? सभागृहातील कोणत्याही सदस्याचा मी एकेरी उल्लेख केला आहे का? त्यांचा अपमान होईल अशी शिवीगाळ केली आहे का? असे प्रश्न अंधारे यांनी केले.
‘भोली सी सूरत, आँखों में मस्ती’ या गीताच्या चालीला कॉपीराइट स्ट्राइक : टी-सिरीजचा कुणालला झटका
कुणाल कामरा याने ज्या ‘भोली सी सूरत, आँखों में मस्ती’ या गीताच्या चालीवर एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत तयार केले आहे त्या मूळ गाण्याचे हक्क टी- सिरीज कंपनीकडे आहेत. त्यामुळे आता या कंपनीने कुणालच्या या विडंबन गीताचा व्हिडिओ ब्लॉक करून त्याला कॉपीराइट स्ट्राइकही केला आहे. तसेच या गाण्याबद्दल कंपनीने त्याला नोटीसही बजावली आहे. त्यावर संतापलेल्या कुणालने ‘टी सिरीजने कठपुतळी होणे थांबवावे’, असा टोला सोशल मीडियावर लगावला आहे.
चाैकशीस गैरहजर राहिल्याने पोलिसांकडून दुसरे समन्स
शिंदेंच्या बदनामीबद्दल दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल याला समन्स बजावून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तो गेला नाही. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी त्याला दुसरे समन्स बजावले आहे. त्याच्या वकिलांनी सात दिवसांची मुदत मागितली होती, पण तो अर्ज पोलिसांनी फेटाळून लावला आहे.