पुण्यात FDAचा बुलडोझर अॅक्शन
31.67 कोटींचा निकोटीनयुक्त हुक्का साठा जप्त; अवैध हुक्का–तंबाखू रॅकेटला जोरदार धक्का
पुणे: राज्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, निकोटीनयुक्त हुक्का आणि तत्सम घातक पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आणखी एक मोठा घाव घातला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. ली.’ या कंपनीवर धाड टाकून तब्बल ₹31 कोटी 67 लाख 21 हजार 987 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारखान्याला सील लावण्यात आली असून संचालक, व्यवस्थापकांसह कंपनीविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई म्हणजे केवळ एक छापा नसून, राज्यव्यापी हुक्का–निकोटीन माफियांच्या कण्यावरचा थेट आघात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आधी नमुने, मग घेराबंदी — ठोस पुराव्यावर कारवाई
FDAच्या माहितीनुसार, 1 डिसेंबर 2025 रोजी कंपनीच्या उत्पादनांचे नमुने उचलण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालात नमुन्यांमध्ये निकोटीन आढळल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार 16 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सरळ उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 2 जानेवारी 2026 रोजी छापा टाकण्यात आला.
छाप्यात विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चा माल आणि सुगंधी मिश्रणे असा एकूण ₹31.67 कोटींचा साठा जप्त करण्यात आला. संपूर्ण युनिट सील करून उत्पादन तात्काळ बंद करण्यात आले.
आरोपी आणि कठोर कलमे
या प्रकरणी
अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर)
असिफ फाजलानी (संचालक)
फैजल फाजलानी (संचालक)
मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. (कंपनी)
यांच्याविरोधात BNS कलम 3(5), 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील कलम 30, 26, 27, 59 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
भिवंडीपासून पुण्यापर्यंत — जुने धागे, नवे धक्के
ही कारवाई भिवंडी दापोडे येथील ‘मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी’ गोदामावर 30 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मोठ्या छाप्याशी जोडलेली आहे. त्या वेळी ‘अफजल’ ब्रँडचा ₹19.45 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला होता. त्या नमुन्यांतही निकोटीन पॉझिटिव्ह आढळले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख करत असून, एकाच नेटवर्कचे अनेक हात उघड होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सीमेवरही धडक — तस्करीचे मार्ग बंद
दरम्यान, जळगाव जामोद येथे महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमेवर वनविभागाने सतर्कता दाखवत ₹75 लाखांचा ‘विमल’ गुटखा व पानमसाला जप्त केला. सातपुडा पायथ्याशी असलेल्या तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. राज्यात बंदी असतानाही छुप्या मार्गांनी होणारी तस्करी रोखण्यासाठी आता सीमांवर कडक तपास लावण्यात आला आहे.
प्रशासनाचा स्पष्ट इशारा
FDA आणि पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,
“निकोटीनयुक्त हुक्का, सुगंधी तंबाखू आणि गुटख्याविरोधात शून्य सहनशीलता.”
आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी, वाहतूक मार्ग आणि लाभार्थी यांचा सखोल तपास सुरू असून, पुढील टप्प्यात अधिक अटका आणि जप्त्या अटळ आहेत.
![]()
![]()
![]()