नागपूर, वर्धा जिल्ह्यातील शाळांना मुसळधार पावसामुळे आज सुट्टी
नागपूर : भारतीय हवामान विभागाने नागपूर व वर्धा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मागील दोन दिवसापासून देखील अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग सेंटर्सना सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अति मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले असून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या व सखल भागातील लोकांनी सतर्क राहावे, असा सल्ला दिला आहे. नागरिकांनी हवामान खात्याचे अपडेट्स लक्षात घेऊन प्रवाशासाठी योग्य नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.