February 7, 2026 4:05 am

लिव्ह-इन नातेसंबंधांवर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

लिव्ह-इन नातेसंबंधांवर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
वारंवार संबंध व अपत्य जन्म = लग्नासारखे नाते

काटा वृत्तसेवा I मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने लिव्ह-इन नातेसंबंधांबाबत एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. दीर्घकाळ चाललेले नाते, वारंवार शारीरिक संबंध आणि त्या नात्यातून मुलाचा जन्म झाला असल्यास, असे नाते लग्नासारखेच मानले जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणात एका 22 वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली कार्यवाही रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच 2022 आणि 2023 मध्ये महिला व तिच्या अल्पवयीन मुलीसाठी दिलेले देखभाल भत्त्याचे आदेश रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती.

न्यायमूर्ती एम. एम. नेर्लीकर यांनी ही याचिका फेटाळत आरोपीविरोधातील खटला कायम ठेवला. मात्र, आरोपीचे पालक आणि त्याची कायदेशीर पत्नी यांना या प्रकरणातून वगळत त्यांना दिलासा देण्यात आला.

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीसोबत तिचे दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. या काळात त्यांच्यात वारंवार शारीरिक संबंध झाले. आरोपीच्या आग्रहामुळे तिने एकदा गर्भपात केला, मात्र नंतर पुन्हा गर्भवती झाल्यावर तिने गर्भपातास नकार दिला. त्यानंतर तिला मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर तिने लग्नाची मागणी केली असता आरोपीने नकार दिला आणि 2022 मध्ये दुसऱ्या महिलेशी लग्न केले. यानंतर महिलेने विविध कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

आरोपीच्या वकिलांनी हा केवळ सूडातून दाखल केलेला खटला असल्याचा युक्तिवाद केला. आठवड्याच्या शेवटी भेटणे किंवा अल्पकालीन संबंध हे घरगुती नाते ठरत नाही, असा दावा करण्यात आला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही.

कोर्टाने स्पष्ट केले की, नात्याचा कालावधी, संबंधांचे स्वरूप आणि त्या नात्यातून अपत्याचा जन्म ही वैवाहिक नात्याची ठोस लक्षणे आहेत. पुरुषाने नंतर दुसरे लग्न केले असले, तरी त्यामुळे पहिल्या नात्यातील महिलेला घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण नाकारता येणार नाही.

घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम 2(फ) अंतर्गत या नात्याला लग्नासारखे नाते मानता येते, असे सांगत न्यायालयाने महिलेला व तिच्या मुलीला कायदेशीर संरक्षण दिले.

0
0

Leave a Reply

Realted News