February 7, 2026 4:05 am

कारंजा शहरात चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव उत्साहात साजरा

कारंजा शहरात चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव उत्साहात साजरा

भोयर-पवार समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल

कारंजा (घा.) : कारंजा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रेत भोयर व पवार समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य मार्गावरून ढोल-ताशांच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली.

भोयर-पवार समाजाचे आराध्य दैवत व समाजवैभव मानल्या जाणाऱ्या चक्रवर्ती राजा भोज यांची जयंती दरवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर देशभर साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने कारंजा येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव २०२६ निमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हेमंतजी ढोले (अध्यक्ष, भोयर-पवार विद्यार्थी मंडळ, कारंजा) होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. धर्मेंद्रकुमार तुरकर (प्राचार्य, प्रशासकीय सेवा पदवी महाविद्यालय, नागपूर) आणि प्रा. श्रीरामजी ढोबाळे (सेवानिवृत्त प्राध्यापक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य प्रचारक) यांनी समाजप्रबोधनपर मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नामदेवराव राऊत (अध्यक्ष, अखिल भारतीय भोयर-पवार महासंघ, नागपूर), श्रीरामजी देशमुख (से.नि. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अमरावती), केशवराव गोयटे (से.नि. अभियंता, लंडन), श्रावणजी फरकाडे (अध्यक्ष, युवा भोयर-पवार मंच, नागपूर), ॲड. प्रकाश धारपुरे (अध्यक्ष, कारंजा तालुका वकील संघ), मोहनराव पठाडे (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भोयर-पवार महासंघ) आणि किशोरजी चोपडे (अध्यक्ष, युवक आघाडी, नागपूर) उपस्थित होते.

तसेच भगवान बुवाडे (उपाध्यक्ष, नगरपंचायत कारंजा), राजेंद्र खवशी (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा) आणि सौ. इंदिराताई कालभूत (अध्यक्षा, भोयर-पवार महिला मंडळ, कारंजा) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत तेजराव बन्नगरे यांनी केले.

यावेळी समाजातील ज्येष्ठ व युवा कीर्तनकार तसेच योग प्रशिक्षकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शोभायात्रेत तालुक्यातील विविध गावांतील भजन मंडळे, लेझीम पथके सहभागी झाली होती.

शहरातील मुख्य मार्गावर शिवसेना कारंजा गृप, भोयर-पवार लंगर मंडळ व जयदादा बेलखडे मित्र परिवार यांच्या वतीने लंगराचे आयोजन करण्यात आले होते. सनशाईन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्रवर्ती राजा भोज, कुलदैवत माता गढकालिका व माता सरस्वती यांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या महोत्सवात तालुक्यातील भोयर-पवार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव समिती व भोयर-पवार विद्यार्थी मंडळ, कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग बन्नगरे यांनी केले, तर हेमंत बन्नगरे यांनी आभार मानले.

0
0

Leave a Reply

Realted News