February 11, 2026 3:50 am

अजित पवारांच्या विमानप्रकरणी रोहित पवारांचे गंभीर आरोप

“अपघात की घातपात? अजित पवारांच्या विमानप्रकरणी रोहित पवारांचे गंभीर आरोप”

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कथित विमान अपघातासंदर्भात गंभीर शंका उपस्थित करत हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा आरोप केला आहे. या प्रकरणी सत्य लोकांसमोर यावे, यासाठी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रेझेंटेशन सादर केले.

“आज अजितदादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. मात्र, ते विचारांनी कायम आपल्यासोबत आहेत,” असे भावनिक वक्तव्य करत रोहित पवार यांनी या संपूर्ण घटनेभोवती अनेक अनुत्तरित प्रश्न असल्याचे सांगितले. सरकारच्या यंत्रणांनी निष्पक्षपणे तपास केला, तर या घटनेचे सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणात रोहित पवार यांनी VSR विमान कंपनी तसेच सुमित कपूर नावाच्या पायलटवर संशय व्यक्त केला आहे.

अफवांमुळे संभ्रम; म्हणून पत्रकार परिषद

रोहित पवार म्हणाले की, या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध अफवा पसरल्या. काहींनी अजित पवार पुन्हा परत येतील असे भावनिक व्हिडीओ पोस्ट केले, तर काहींनी विमानातील प्रवासी संख्या आणि पार्थिव न सापडल्याबाबत दावे केले. या सर्व चर्चांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला. त्यामुळेच सत्य मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी पुढील गंभीर प्रश्न उपस्थित केले:

  • जे पायलट नियोजित नव्हते, ते ऐनवेळी कॉकपिटमध्ये कसे आले?

  • विमान उडवणाऱ्या पायलटची ‘ब्रेथ अनालायझर’ चाचणी झाली होती का?

  • वैमानिक मदन हे नियोजित असताना ऐनवेळी सुमित कपूर आणि शांभवी पाठक कसे आले?

  • मूळ पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा खरा आहे का? त्यांचे CDR आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले का?

  • सुमित कपूर यांना दारूचे व्यसन असल्याच्या तक्रारी पूर्वी होत्या का?

  • खासगी विमानांसाठी नियम शिथिल असल्यामुळे तपासणी टाळली गेली का?

  • सुमित कपूर यांनी यापूर्वी नांदेड येथे विमान धोकादायक पद्धतीने उतरवल्याची तक्रार होती का?

  • अजित पवार नेहमी वेळेआधी पोहोचणारे असताना विमानाला ७० मिनिटांचा विलंब का झाला?

  • या विलंबाच्या काळात विमान किंवा वैमानिकांसोबत काही घडले होते का?

अपघाताबाबत सखोल चौकशीची मागणी

रोहित पवार यांनी पुढील बाबींवरही चौकशीची मागणी केली:

  • मूळ प्रवास कारने ठरलेला असताना शेवटच्या क्षणी विमानाचा पर्याय का निवडण्यात आला?

  • अपघाताच्या दिवशी दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलले गेले?

  • अपघाताच्या वेळी ‘मेडे कॉल’ का देण्यात आला नाही?

  • ट्रान्सपाँडर बंद का होता?

  • टेकऑफपूर्व तपासणी, टेकलॉग आणि एअरवर्थीनेस रिपोर्ट कुठे आहेत?

  • VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिले आणि तो अहवाल सार्वजनिक का करण्यात येत नाही?

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी यावेळी केली.

0
0

Leave a Reply

Realted News