February 16, 2026 4:22 am

मोहपा (उमरेड) येथे भीषण अपघात

बारावीच्या परीक्षेला जात असताना वडील-मुलीचा जागीच मृत्यू; एक युवती गंभीर

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहपा गावाजवळ गुरुवारी सकाळी गिट्टीने भरलेल्या ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात वडील व मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना उमरेड पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

या अपघातात सुभाष केशव भिवणकर (वय ५०) आणि त्यांची मुलगी जान्हवी सुभाष भिवणकर (वय १८) यांचा मृत्यू झाला. दोघेही मोहपा येथील रहिवासी होते. वंशिका ज्ञानेश्वर नरुले (वय १८) ही गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष भिवणकर हे त्यांची मुलगी जान्हवी आणि वंशिका यांना बारावीच्या परीक्षेसाठी उमरेडकडे दुचाकीवरून घेऊन जात होते. गुरुवारी दोघींचा बारावीचा महत्त्वाचा पेपर होता. मोहपा गावाबाहेर पडताच गिट्टीने भरलेल्या एमएच ४० बीजी ७७५० क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की सुभाष भिवणकर आणि जान्हवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. संतप्त जमावाने ट्रकचालकाला मारहाण केली आणि ट्रकच्या केबिनला आग लावली.

घटनेची माहिती मिळताच नागपूर जिल्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आरसीबी पथक व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

0
0

Leave a Reply

Realted News