ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनाला माकपचा पाठिंबा; आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

का टा वृत्तसेवा I मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने आयोजित या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मैदानाकडे जाणारे काही मार्ग बंद केले. ग्रँट रोड परिसरातूनही काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी करत अटकेचे आदेश दाखवण्याची मागणी केली.

दरम्यान, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत डी. एन. नगर पोलीस ठाण्यात पोहोचले. तुषार गांधी यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या दिला. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली.

केंद्रीय सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात नाराजी

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसह निवडणूक प्रक्रियेबाबतच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी भूमिका घेतली आहे. दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईत उमटल्याने राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांच्या कारवाईमुळे आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले.

0
0

Leave a Reply

Realted News