कळमेश्वरमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; बंजारी माता व दुर्गा देवी संस्थान भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज
११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन
काटा वृत्तसेवा I सतीश पांडे :
कळमेश्वर, प्रतिनिधी : कळमेश्वर शहरातील बंजारी माता संस्थान आणि हुडको कॉलनी येथील दुर्गा देवी मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार असून, भाविकांच्या स्वागतासाठी दोन्ही संस्थाने सज्ज झाली आहेत.
नवरात्रोत्सवानिमित्त बंजारी माता व दुर्गा देवीच्या दर्शनासाठी कळमेश्वरसह परिसरातील मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे. या काळात अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर भर
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रणाचे नियोजन करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.
११ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना मातेचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भाविकांना संस्थान समितीचे आवाहन
नवरात्रोत्सवात भाविकांनी गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे. सकाळी, दुपारी किंवा सायंकाळी सोयीच्या वेळेत दर्शनासाठी येऊन सहकार्य करावे, असे आवाहन बंजारी माता संस्थान आणि दुर्गा देवी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
📢 कामगार टाइम्स* बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क I सतीश पांडे : 📲 9561480227
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून







