April 19, 2025 8:18 am

राज्यात प्रतिदिन मिळणार अवघे ३१२ रुपये ‘रोहयो’ मजुरी

‘रोजगारा’ला १५ रुपये अत्यल्प वाढीची ‘हमी’

१ एप्रिलपासून दरपत्रक लागू

भंडारा : महागाईच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचे भत्ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दुसरीकडे रोजगार हमीवर काम करणाऱ्यांच्या मजुरीत मात्र तुलनेने अत्यल्प वाढ करण्यात आली आहे. यावरून ग्रामीण भागात घाम गाळणाऱ्या मजुरांप्रती आपल्याला फारशी आत्मीयता नसल्याचेच शासनाने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत महाराष्ट्रात अवधी १५ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानुसार आता मजुरांना दर दिवसाला ३१२ रुपये मिळणार असून १ एप्रिल २०२५ पासून हे दरपत्रक लागू करण्यात आले.
                       मजुरांना रोजगार मिळावा आणि शेती विकासासाठी विविध योजनाही राबवता याव्यात यासाठी रोजगार हमी योजनेतून विविध कामे केली जात आहेत. यात प्रामुख्याने सिंचन विहिरी, फळबाग लागवड, शेततलाव, घरकुले, गायगोठा, शेळीपालन गोठा आदी कामे केली जात आहेत.

                        पाच एकरांपेक्षा कमी जमीनक्षेत्र असलेले तसेच जॉबकार्ड असलेले लाभार्थी रोजगार हमी योजनेच्या कामाचा लाभ घेऊ शकतात. केंद्र सरकार या योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत वाढ करते. गेल्या वर्षी २९७रुपये मजुरी मिळत होती. १ एप्रिलपासून नव्या दरांनुसार ३१२ रुपये मजुरी मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व रोजगार हमी विभागाने याबाबत तालुका गटविकास अधिकाऱ्यांना कळवले असून, एप्रिलपासून नव्या दरानुसार मस्टर भरून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News