तीन महिन्यांपासून 34 हजार डॉक्टर, नर्सेस वेतनाविना
का टा वृत्तसेवा Ι नाशिक : केंद्र व राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रात शहरी, ग्रामीण भागात बालमृत्यू, माता मृत्यूंचे प्रमाण राेखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवले जाते. त्यात कार्यरत डाॅक्टर, परिचारिका यांच्यासह सुमारे ३४ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. केंद्राकडून निधी येत नसल्याचे कारण पुढे केले जात असले तरी लाडकी बहीण याेजनेमुळेच आराेग्याचा पुरेसा निधी वित्त विभागाकडून दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, येत्या दाेन ते तीन दिवसात वेतन न झाल्यास डाॅक्टरांसह सर्वच कर्मचारी संपावर जाऊन राज्यभरातील आराेग्य सेवा ठप्प हाेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय आराेग्य अभियानांर्तगत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक उपचार केंद्रात एमबीबीएस, बीएएमएस दर्जाचे डाॅक्टर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यामार्फतच शासनाच्या विविध आराेग्याच्या याेजना, उपचार व सुविधा ग्रामीण भागात शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचवण्याचे काम केले जाते. यासाठी केंद्राकडून ६० टक्के तर ४० टक्के राज्य सरकारचा वाटा असा निधी उपलब्ध करून दिला जाताे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील १८०० ते २००० कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३.५० काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतरच वेतन अदा केले जाईल, असे आरोग्य विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. राहुल हाडपे यांनी स्पष्ट केले आहे.
औषधाेपचार, ॲम्ब्युलन्स सेवा थांबण्याची शक्यता
ॲम्ब्युलन्स इंधनासाठी व देखभाल- दुरुस्तीसाठी निधीची चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ॲम्ब्युलन्स बंद राहतील. तसेच औषधीसाठी निधी उपलब्ध न झाल्यास थेट जिल्हा रुग्णालयातच रुग्ण पाठवावे लागतील.