लग्नमंडपातच वडिलांचा मृत्यू, घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळले

लेकीचे कन्यादान केले अन् अचानक हृदयविकाराचा झटका आला

भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकताच लग्न मंडपातच वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तुमसर तालुक्यातील झारली गावात दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. लग्न लागत असतानाच वडिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळले आहे. गणेश खरवडे (54) असे मृत वडिलांचे नाव आहे.
                      मुलीच्या लग्नातच वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत वडील गणेश वरखडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे एक एकर शेती आहे. आपल्या लेकीच्या लग्नासाठी कष्टाने पैसा उभा करत थाटात लग्न लावले. दुपारी मुलीचे कन्यादान झाले व पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. त्यावेळी स्टेजवरच वधूच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिथेच ते कोसळले व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. तसेच वडिलांच्या अचानक निधनामुळे वधूची पाठवणी देखील थांबवण्यात आली आहे.

दरम्यान, यवतमाळ येथे देखील अशीच घटना घडली होती. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आणि यातच त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. पुसद पंचायत समितीचे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.

प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत आयएएस अधिकारी पदावर निवड झाली. या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी गावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमातच प्रल्हाद खंदारे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने महागाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. खंदारे कुटुंबावर यामुळे शोककळा पसरली आहे. आनंदाचा क्षण क्षणात दुःखात बदलून गेला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News