जगाला युद्ध नको, बुद्धांचे विचार हवेत! – सुनील केदार

युद्धखोर मानसिकतेवर प्रहार; शांतता, समता, करुणा आणि बंधुत्वाचा संदेश देत कळमेश्वरच्या बुद्धभूमीवर धम्ममेळावा उत्साहात

कामगार टाइम्स वृत्तसेवा | भूषण सवाईकर

कळमेश्वर : जगभरात युद्ध, हिंसाचार आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असताना मानवतेला विनाशाच्या नव्हे, तर शांततेच्या मार्गावर नेण्याची नितांत गरज आहे. जगाला युद्धाची नाही, तर भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची आवश्यकता आहे. शस्त्रांच्या बळावर सत्ता मिळवता येईल; मात्र माणसांची मने जिंकण्यासाठी बुद्धांचे विचारच आवश्यक आहेत, असे परखड प्रतिपादन माजी मंत्री सुनील केदार यांनी केले.

कळमेश्वर तालुक्यातील बुद्धभूमी, रामगिरी येथे विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघ, नागपूर यांच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित धम्ममेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि बौद्ध चळवळीतील अनेक मान्यवरांसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युद्धातून मानवतेचा विनाश; बुद्धविचार हाच शांततेचा मार्ग!

भगवान गौतम बुद्धांनी जगाला अहिंसा, करुणा, समता, शांती आणि बंधुतेचा अमूल्य संदेश दिला. मात्र आजच्या काळात मानवतेपेक्षा सत्तेला आणि शांततेपेक्षा संघर्षाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र आहे. युद्धामध्ये कोणाचाही खरा विजय होत नाही. त्यातून केवळ जीवितहानी, विध्वंस आणि मानवतेचे अपरिमित नुकसान होते.

बुद्धांचे विचार केवळ व्यासपीठावरील भाषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्येकाने आपल्या आचरणात आणले पाहिजेत. परस्पर द्वेष, भेदभाव आणि हिंसक मानसिकतेवर मात करण्यासाठी बुद्धांच्या विचारांची आज जगाला अधिक गरज असल्याचे केदार यांनी अधोरेखित केले.

मान्यवरांची उपस्थिती; धम्मविचारांचा जागर

कार्यक्रमासाठी आशिष देशमुख, श्रावण भिंगारे, वैभव घोंगे, माधव चरण, बाबा कोढे, वीरेंद्र बैस पाटील, हर्षदीप रंगारी, आशिष देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शांतता, समता आणि बंधुतेचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प

धम्ममेळाव्याच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक एकोपा आणि मानवतावादी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वाढत्या जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बुद्धांचा शांततेचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.


📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईल वर, थेट आपल्या गावातून

भूषण सवाईकर : 📲 97645 07440

1
0

Leave a Reply

Realted News