कळंबी येथील रितेश मोहोड, यांचे गावाशेजारच्या गोठ्यातील घटना
शिकारीच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांत प्रचंड दहशत
कळमेश्वर : बिबट्याने गावालगतच्या गोठ्यात प्रवेश करीत दोन वासरांची शिकार केली. ही घटना शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली. बिबट गावालगत येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रितेश मोहोड, रा. कळंबी हे शेतीसोबत दुग्धव्यवसाय करीत असल्याने त्यांनी दुधाळ जनावरे पाळली आहेत. या गुरांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी गावालगत गोठा बांधला आहे. त्यांची सर्व जनावरे शनिवारी रात्र गोठ्यात बांधली असताना बिबट्याने मध्यरात्री आत प्रवेश केला आणि दोन वासरांचा फडशा पाडला. सकाळी हा प्रकार लक्षात येताच रितेश यांनी वन विभागाला कळविले. त्यामुळे वनरक्षक एम. सी. बोपटे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ही शिकार बिबट्याने केल्याचे त्यांनी सांगितले.
कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी व कळंबी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्याने २१ जानेवारीच्या मध्यरात्री मनोज बेलेकर यांच्या शेतात त्यांच्या दीड वर्षाच्या कालवडीची शिकार केली. त्यापूर्वी आलेसूर शिवारात प्रकाश मोहोड यांच्या शेतात त्यांच्या तीन वासरांचा, केतापार शिवारात सुरेश धोतरकर यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला. बिबट गुरांची वारंवार शिकार करीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच त्याच्या भीतीमुळे शेतात कुणीही जाण्याची हिंमत करीत नाही. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कळंबीचे सरपंच विनोद भोयर, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष रजनीकांत अतकरी यांच्यासह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी केली आहे.