श्रीरामपूर येथे पंधरा वर्षांपासून निःशुल्क सुसंस्कार शिबिर, कीर्तनमाला व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन
प्रतिनिधी | पुसद : ‘आपल्या गावात एखादे विधायक लोकोपयोगी कार्य कराल तरच खऱ्या अर्थाने ती ग्रामजयंती होईल. श्रीरामपूर ग्रामपंचायत व गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त सहकार्याने मागील पंधरा वर्षांपासून निःशुल्क सुसंस्कार शिबिर, कीर्तनमाला व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा केला जातो, ही खरी ग्रामजयंती होय, ’असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी केले.
गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामपंचायत श्रीरामपूर यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भारत पेन्शनवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे अमरावती विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप, विशेष अतिथी श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण वानखेडे, जि. प.चे माजी सदस्य शिवाजी सवनेकर, सरपंच आशिष काळबांडे, सदस्य विजय राठोड, मधुकर कलींदर उपस्थित होते.
सर्वप्रथम सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आसनाचे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की गावाचा विकास राष्ट्राचा विकास होय, पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे, परस्परातील मतभेद दूर करून संघटित समाजाद्वारे गावाचा विकास करण्याचे प्रभावी साधन सामुदायिक प्रार्थना होय, पाण्याचे महत्त्व सांगून येणाऱ्या पावसाळ्यात सर्वांनी पाणी जमिनीत मुरवण्याचे आवाहन बिजवाल यांनी केले.
ग्रामगीता देश प्रगती पथावर नेण्याची गुरुकिल्ली : जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांनी केले. या वेळी दिगंबर जगताप यांनी ग्रामगीता देश प्रगती पथावर नेण्याची गुरुकिल्ली असून, तिचे घरोघरी वाचन व अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूरद्वारे वर्षभर सातत्यपूर्ण अनेक कार्यक्रम राबवले जातात. हे प्रशंसनीय कार्य आहे. यात लोकसहभाग कधीच कमी पडणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. भारत पेन्शनवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळाचा भजनांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे संचालन ग्रामगीताचार्य मुक्ता काळबांडे यांनी केले तर आभार सरपंच आशिष काळबांडे यांनी मानले. कार्यक्रमाला गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.