श्रीरामपूर येथे पंधरा वर्षांपासून निःशुल्क सुसंस्कार शिबिर, कीर्तनमाला व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन
प्रतिनिधी | पुसद : ‘आपल्या गावात एखादे विधायक लोकोपयोगी कार्य कराल तरच खऱ्या अर्थाने ती ग्रामजयंती होईल. श्रीरामपूर ग्रामपंचायत व गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त सहकार्याने मागील पंधरा वर्षांपासून निःशुल्क सुसंस्कार शिबिर, कीर्तनमाला व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा केला जातो, ही खरी ग्रामजयंती होय, ’असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी केले.
गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामपंचायत श्रीरामपूर यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भारत पेन्शनवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे अमरावती विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप, विशेष अतिथी श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण वानखेडे, जि. प.चे माजी सदस्य शिवाजी सवनेकर, सरपंच आशिष काळबांडे, सदस्य विजय राठोड, मधुकर कलींदर उपस्थित होते.
सर्वप्रथम सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आसनाचे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की गावाचा विकास राष्ट्राचा विकास होय, पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे, परस्परातील मतभेद दूर करून संघटित समाजाद्वारे गावाचा विकास करण्याचे प्रभावी साधन सामुदायिक प्रार्थना होय, पाण्याचे महत्त्व सांगून येणाऱ्या पावसाळ्यात सर्वांनी पाणी जमिनीत मुरवण्याचे आवाहन बिजवाल यांनी केले.










