June 24, 2025 11:32 am

भाजप नेत्याच्या कंपनीवर ईडीची छापेमारी

वनविभागाची जमीन हायवेला विकल्याचा आरोप,

गेल्याच महिन्यात केला होता पक्षात प्रवेश

मुंबई : गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या पनवेलमधील जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. आरक्षित वनजमिनीचे बेकायदेशीर संपादन करून ती नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) ला विकल्याचा आरोप म्हात्रे यांच्यावर असून, या प्रकरणात तब्बल 50 कोटी रुपयांची शासनाची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
                        विशेष म्हणजे, जे. एम. म्हात्रे यांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत प्रितम म्हात्रे यांनीही पक्षप्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही म्हात्रे यांच्यावर ईडीने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे वनविभागाची जमीन बळकावल्याचे प्रकरण

                         ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या पनवेलमधील कार्यालयावर छापा टाकून दस्तावेज जप्त केले आहेत. हा गैरव्यवहार 2005 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे वनविभागाच्या जमिनीचा ताबा घेतल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. उरण वनविभागाने याप्रकरणी 2023 मध्ये तक्रार दाखल केली होती, ज्यावर कारवाई करत ईडीने ही धाड टाकली आहे.
                          हा व्यवहार पनवेल तालुक्यातील मौजे वहाळ गावात करण्यात आला होता. जे. एम. म्हात्रे यांनी या प्रकरणातील 1.86 हेक्टर जमीन NHAI ला विकून 42.4 कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे. तसेच, सहआरोपी सय्यद कादरी यांनी त्याच भूखंडातील 0.44 हेक्टर जमीन विकून 9.69 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

जे. एम. म्हात्रे यांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला

                         जे. एम. म्हात्रे हे पनवेल-उरण तालुक्यातील शेकापचे मोठे नेते होते. पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. महाविकास आघाडीमध्ये शेकापची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप जे. एम. म्हात्रे यांनी 29 एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन केला होता. शेकापमध्ये निष्ठेने काम केल्यानंतरही आपल्याला बाजूला सारण्याचे प्रयत्न झाले, असा आरोप त्यांनी केला होता. अखेर जे. एम. म्हात्रे यांनी 10 मे रोजी अनेक स्थानिक नगरसेवक, माजी पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News