June 24, 2025 12:55 pm

नरबळीच्या संशयाने पंचक्रोशीत खळबळ

जळगावात 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या,

शेजारच्या गावात सापडला मृतदेह

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 वर्षीय तेजस महाजन या मुलाची गळा चिरून हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, ही हत्या नरबळीसाठी करण्यात आली का? असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

                          जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एक अंगावर शहारा आणणारी घटना उघडकीस आली आहे. रिंगणगाव येथे राहणाऱ्या 13 वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याचा मृतदेह शेजारच्या खर्ची गावाजवळील शेतात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या नरबळीच्या उद्देशाने झाली असावी, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

                          सोमवारी संध्याकाळी बाजारात फिरताना तेजसने एका दुकानातून बिर्याणी घेतली होती. मात्र त्यानंतर, सायंकाळी सात वाजल्यापासून तो कुणालाच दिसला नाही. बेपत्ता झाल्यानंतर गावात शोधमोहीम सुरू झाली. जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु त्याचा काहीही पत्ता लागला नव्हता. बाजार परिसर थोडा आत असल्यामुळे सुरुवातीला कोणाचेही तिकडे लक्ष गेले नाही. अखेरीस, एका व्यक्तीला तेजसचा मृतदेह आढळून आला. त्याने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

                           तेजस महाजन हा आपल्या कुटुंबासह रिंगणगाव येथे राहत होता. तो 16 जूनपासून बेपत्ता झाला होता. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला, मात्र कुठेही काही माहिती मिळाली नाही. अखेर, आज एरंडोल पोलिस ठाण्यात तेजसच्या बेपत्ताची नोंद करण्यात आली. पोलिसांनीही लगेच शोधमोहीम सुरू केली.

                           दरम्यान, खर्ची गावाजवळील एका शेतात तेजसचा मृतदेह आढळून आला. गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. श्वानपथक व फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News