शेतावर अतिक्रमण करून चौघांनी मानसिक त्रास दिल्याचा चिठ्ठीत उल्लेख
चांदूर बाजार तालुक्यातील देवरी येथील मूळ रहिवासी गोपाल राणे हे अमरावतीमधील राठीनगर भागात कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. गुरुवारी ते त्यांच्या पत्नीसह मॉर्निंग वॉकला गेले होते. परत आल्यानंतर मी मागील खोलीत लिहीत बसतो, असे पत्नीला म्हणाले. त्यांना कविता, विविध विषयावर लेखन करण्याचा छंद होता. त्यामुळे पत्नीला वाटले ते खोलीत बसून लिखाण करत आहे. मात्र बराच वेळ होऊनही ते खोली बाहेर आले नाहीत.
त्यामुळे पत्नीने त्यांना आवाज दिला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. खोलीचे दारही आतून बंद होते. त्यामुळे गोपाल राणे यांच्या पत्नीने घरातच पहिल्या माळ्यावर झोपलेल्या मुलाला आवाज दिला. मुलगा ओमप्रकाशने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी गोपाल राणे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
या घटनेची माहिती कुटुंबीयांनी गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यावेळी तेथे एक चिठ्ठी आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली. या चिठ्ठीत त्यांनी मानसिक त्रास व धमकी देणाऱ्या चार जणांची नावे लिहिली आहेत. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान गुरुवारी रात्री गोपाल राणे यांचा मुलगा ओमप्रकाश राणे (२३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
फाजलापूरच्या शेतीत अतिक्रमण गोपाल राणे यांचे फाजलापूर शिवारात असलेल्या एका शेतावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्या वादातून मला मानसिक त्रास देण्यात येत आहे. शिवीगाळही करण्यात आली आहे. तसेच मारण्याची धमकी देत आहेत. याचवेळी आपल्या आत्महत्येला चार व्यक्ती जबाबदार असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे.
सुसाईड नोट मिळाली असून, गुन्हा दाखल करण्यात येईल . राणे यांनी आत्महत्या केली असून त्याच ठिकाणाहून आम्हाला एक ‘सुसाईड नोट’ मिळाली आहे. शेतावर अतिक्रमण केल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे. या प्रकरणी चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. –सागर पाटील, पोलिस उपायुक्त, झोन १ अमरावती.