घोटाळेबाज धोटेचा मेयोत किती दिवस मुक्काम ?
कामगार टाइम्स I संजय श्रीखंडे
नागपूर : ‘‘बोगस शालार्थ आयडी व शिक्षक भरती कांड’’ यातील अटकेतील आरोपी व मोहपा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे धापेवाड्याचे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धोटेची अद्यापही चौकशी झालेली नाही. अपेक्षेप्रमाणे कोणत्याही सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या गांवगुंड-भंगारछाप नेत्यांपासून तर तथाकथीत लोकप्रतीनिधींपर्यंत अटक होताच् गर्भार झाल्यागत या आरोपीेची रवानगीही मेयो इस्पितळात झाली होती.
तपास यंत्रणेलाही याची कल्पना असेलंच? बरेचदा अशी प्रकरणे कुणी अदृश्य शक्तिद्वारे अटकपूर्व किंवा अटकेनंतर, पुर्वनियोजीत व निर्देशीत असतात, यांवरही जनतेचा बर्यापैकी विश्वास आहे. पण कायदा आपलं काम चोखपणे बजावणार यावंरही सर्वसाधारण भाबडी मतदार-जनता मात्र 100 टक्के विश्वास आणि नजर ठेवून आहे. यात दोष कुणाचा? रस्त्याचा…? की लुंगीतल्या व्यवस्थेचा? मात्र अद्यापही दिलीप धोटेचा मेयो इस्पितळातंच् मुक्काम असल्याने पोलिसांना दिलीप धोटेंच्या चौकशीसाठी मुहुर्ताचीच प्रतिक्षा करावी लागेल?

तर दुसरीकडे मोठ्या संख्येने पोलीसांच्या रडारवर व तुर्तास लापता असलेल्यांच्या या घोटाळयाने आयुष्यातून उध्वस्त झालेले शिक्षक, त्यांचे गरिब-शेतकरी पालक व प्रत्यक्षात सर्वसाधारण नागरिकांच्या टॅक्सच्या पैस्याची लूट करणारे सरकारी भामटे कर्मचारी व संबंधीत संचालक हाच नागरिकांमध्ये सध्या जोरदार चर्चैचा विषय आहे.
‘कायदा’ ही दुधारी तलवार आहे, असं म्हटलं जातं आणि ओल्यासोबत वाळलंही जळतेच् हेही प्रमाणित आहे. सध्या जो आरोपी पोलीसांनी उचलला त्याच्या जागी कोणी अन्य रंगाचा आरोपी पोलीसांच्या हाती लागला असता, तर आतास्तोवर त्याच्या बुडाचे छिलके निघाले असते अनं त्याच्या घरावर बुल्डोजर चालला असता? किंबहुणा तशी मागणी इमानदार नेत्यांनी केली असती.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम
शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपी व मोहपा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटे अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या कळमेश्वर तालुक्यात प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा (मोहपा) व धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत. शनिवारी सायबर पोलिसांनी दिलीप धोटे यांना ५ शिक्षकांचा बोगस आयडी तयार केल्याप्रकरणी अटक केली होती.

धोटेंनी काही वर्षापूर्वी शाळेत ८ शिक्षकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार केले. यातील ५ शिक्षकांचा १० वर्षाचा अरियर्स काढण्यासाठी म्हणजे प्रत्येक शिक्षकांचे १३ ते १४ लाख रुपये काढून देण्यासाठीही त्यांनी शिक्षकांकडून पैसे वसूल केले. यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार त्यांनी केल्याची माहिती आहे. दिलीप धोटेंना अटक केल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र धोटे तेव्हापासून मेयो रुग्णालयातच उपचार घेत आहेत. त्यामुळे पोलिसांना Get well soon... प्रार्थना करण्याशिवाय काहीच पर्याय नाही.

