वर्धेतील घटना, कपाशीची लागवड करत असताना दोघांच्या डोक्यात घातली कुऱ्हाड
काटा वृत्तसेवा : राजेश बाभूळकर
वर्धा : शेतीच्या वादातून काकूसह चुलतभावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना अल्लीपूर पोलिस ठाणे हद्दीत निमसडा शिवारात काल शनिवारी सकाळी घडली. खून केल्याचा पश्चात्ताप झाल्याने लगेच आरोपी पुतण्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.
आरोपी महिंद्रा मोहिजे (५६) याच्याकडे ४ एकर तर त्याची काकू साधना मोहिजे (५५) यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. महिंद्रा आणि साधना यांच्यात शेतीवरून नेहमीच वाद होत होता. शनिवारी साधना मोहिजे व त्यांचा मुलगा नितीन मोहिजे (२७) हे दोघे शेतात कपाशीची लागवड होते.
महिंद्राने या मायलेकाचा काटा काढण्यासाठी ९ वाजता शेत गाठले आणि काकू साधना मोहिजेसोबत वाद घातला. त्या वेळी मुलगा नितीनने आईची बाजू घेतली असता महिंद्राने दोघांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत दोघांचाही खून केला. नंतर काकू व चुलतभावाच्या हत्येचा पश्चात्ताप झाल्याने महिंद्राने विष प्राशन केले.
तत्काळ ग्रामस्थांनी त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वर्धा एसपी अनुराग जैन पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
शेतामधून नाला गेला, त्यावरून झाला होता वाद
आरोपी व मायलेकाच्या शेतातून नाला गेला होता. त्यात दोघांमध्ये पावसाळ्यात शेतात साचलेल्या पाण्यावरून नेहमी वाद होत होते. महिंद्राचा मुलगा बाहेरगावी राहत असल्याने तो निमसडा येथे एकटा राहत होता. आरोपीने दोघांना शेतात जाताना बघितले आणि हत्येचा कट रचला व स्वतःचेही जीवन संपवले.