अनियंत्रित ट्रेलरची दोन कारला जोरात धडक, चौघे गंभीर जखमी
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी परिसरातील घटना
कळमेश्वर : वेगात जाणाऱ्या अनियंत्रित ट्रेलरने वळण घेत असलेल्या ट्रकसोबतच विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन कारला जोरात धडक दिली. या विचित्र अपघातात एका कारमधील चौघे गंभीर जखमी झाले असून, काहींना किरकोळ दुखापत झाली. ही घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी (ता. कळमेश्वर) येथील बसस्टॉपजवळ रविवारी (दि. २९) रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास घडली.
एमएच-०४/एलक्यू-८३७८ क्रमांकाचा ट्रक गोंडखैरी येथील बसस्टॉपजवळ वळण (यू टर्न) घेत असताना नागपूरहून गोंडखैरी, कोंढाळी मार्गे अमरावतीच्या दिशेने वेगात जात असलेल्या एमएच-४०/सीएम-९१०१ क्रमांकाच्या ट्रेलरने एमएच-०४/एलक्यू-८३७८ क्रमांकाच्या ट्रकला जोरात धडक दिली. त्याचवेळी त्या ट्रेलरने आधी अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४९/बीके-४०७० क्रमांकाच्या कारला आणि नंतर या कारच्या मागे असलेल्या अमरावतीहून नागपूरला जात असलेल्या एमएच-३१/एफयू-५०७२ क्रमांकाच्या दुसऱ्या कारला जोरात धडक दिली.
अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान
यात एमएच-४९/बीके-४०७० क्रमांकाच्या कारमधील चौघांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांची नावे कळू शकली नाहीत. शिवाय, दुसऱ्या कारमधील पाचही जणांना तसेच ट्रक व ट्रेलर चालकांना सुदैवाने फारशी इजा झाली नाही. मात्र, या अपघातात दोन्ही कारसह ट्रक व ट्रेलरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सूचना देत पहिल्या कारमधील चारही जखमींना तातडीने नागपूरला हलविले. त्यामुळे त्यांच्या नावांची पोलिस दप्तरीदेखील नोंद नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी एमएच-३१/एफयू-५०७२ क्रमांकाच्या कारमधील प्रमोद भास्करराव बुरडकर (६३, रा. राजीवनगर रोड, सोमलवाडा, नागपूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.