गडचिरोलीत अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या पालकांवर कारवाई
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
नागपूर : अल्पवयीन मुलांना दूचाकी वापरण्यासाठी देणाऱ्या २४ पालकांवर गडचिरोली पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे पालकांमध्ये खळबळ माजली आहे. गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे गेल्या काही काळात शहरातील अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अल्पवयीन मुले देखील विनापरवाना दुचाकी चालवित असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
पोलिसांनी यासाठी शहरात विविध चौकात तपासणी मोहीम हाती घेतली होती. या दरम्यान अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या दोन दिवसांत २४ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलांकडेकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसताना देखील त्यांच्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी दिल्याने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९ (ए) अन्वये २४ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कायद्यान्वये अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरण्यात येते.
अल्पवयीन बालकाकडून गुन्हा घडल्यास अशा वाहनाच्या मालकास ३ वर्षापर्यंत कारावास किंवा २५ हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे. तसेच अशा अल्पवयीन बालकावर बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार बाल न्याय मंडळासमोर खटला सुद्धा चालविला जाऊ शकतो. या मोहीमेचा उद्देश शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा असून, पालकांनी देखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतूकीविषयीच्या सर्व नियमांची माहिती करुन द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.











