देवपूजा वंदन सोहळ्याला श्री क्षेत्र देवबर्डीतुन होणार प्रारंभ, महानुभाव पंथाची ८०० वर्षाची परंपरा
का टा वृत्तसेवा : विजय नागपूरे
कळमेश्वर : आषाढ महिना लागतात भाविकांच्या भक्तीला उधाण आलेले आपणास पाहावयाला मिळते. आषाढ, श्रावण तर सण उत्सवाचा महिना. सध्या पंढरपूरच्या दिशेने अनेक वारकरी दिंडी पताका खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण करत असलेले दृश्य आपण पाहत आहोत. तर इकडे महानुभाव भक्त मंडळी परमेश्वराच्या श्रीचरण स्पर्शाने पुनीत श्रीमूर्ती, वस्त्र प्रसाद, विलोभनीय अशी परंपरा देवपूजा वंदन करण्यासाठी एकादशी ते आषाढी पौर्णिमेपर्यंत गावोगावी मठ मंदिर आश्रमात भेटी देतात, अशी माहिती आचार्य प्रवर महंत श्री वाकिकर बाबा (श्रीक्षेत्र देवबर्डी) यांनी दिली.
महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथी अनुयायी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईपासून गोंदिया, लातूर पासून नंदुरबार, चंद्रपूर पासून नाशिक सर्व दूर अनेक मोठे मंदिर आश्रम उपलब्ध आहेत. हजारो वर्षापासून संत महंतांनी त्यागी तपस्वी साधकांनी परमेश्वर अवतारांच्या स्पर्श सबंधित व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभू यांनी भक्तांना प्रसन्न होऊन दिलेल्या वस्तू अत्यंत श्रद्धेने व प्रयत्नाने सांभाळून ठेवलेल्या आहेत. ही सर्व देवपूजा सुरक्षित रहावे या उद्देशाने पेटीमध्ये बंद असते. परंतु अशा उत्सव प्रसंगी सिंहासन रचुन त्यावर रेशमी वस्त्रे अंथरुन तिची योग्य पद्धतीने मांडणी करतात व येणाऱ्या भाविक भक्तांना वंदन करण्यासाठी उपलब्ध करून देतात.सर्व भारतातून अनेक राज्यातून आलेली मंडळी याचा लाभ घेतात.
