सत्ताधारी आमदाराला रस्त्यावर आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ : पंकज घाटोडे,तालुका अध्यक्ष, आम आदमी पार्टी, सावनेर
का टा वृत्तसेवा
सावनेर : सावनेर विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडून आले असूनदेखील, आज त्यांना स्वतःच्या सरकारच्या विरोधातच रस्त्यावर आंदोलन करावं लागतंय, ही गोष्ट अत्यंत गंभीर व दुर्दैवी आहे. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असून, त्या पक्षाचाच आमदार आज टोल बंदसाठी आंदोलन करत असेल, तर यामागे शासन-प्रशासनाची ढिसाळ कार्यपद्धती आणि निर्णयक्षमतेचा अभावच दिसून येतो. असा आरोप आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांनी केला आहे.
आमदाराने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित मंत्री, विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही निर्णय होत नसेल, तर याचा अर्थ सरकार स्वतःच्या आमदारालाही गंभीरपणे घेत नाही, हे चित्र लोकांसमोर उभं राहतंय. सत्तेत असलेल्या आमदारालाच प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करावं लागत असेल, तर सामान्य जनतेच्या न्यायासाठी कोण लढणार? जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे की आंदोलकांची? असेही पंकज घाटोडे म्हणाले.
निवडून दिलेल्या आमदारा कडून जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले गेले पाहिजेत. सत्ताधारी आमदारांचे आंदोलन म्हणजे स्वतःच्या सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब आहे. जर सरकार आपल्या आमदारांचाही आवाज ऐकत नसेल, तर ही परिस्थिती लोकशाहीचा उपहास आहे. आम आदमी पार्टी सावनेर विधानसभा क्षेत्र या प्रकाराचा तीव्र निषेध करते. शासनाने तात्काळ लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना विनाकारण रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही याची जबाबदारी घ्यावी, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असल्याचे घाटोडे म्हणाले.