शिक्षिकेकडून 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
मुंबईतील धक्कादायक घटना उघडकीस
मुंबई : भारतीय संस्कृतीत गुरूला, शिक्षकांना फार महत्त्व आहे. परंतु, मुंबई येथील एका घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिक्षण देण्याचे पवित्र काम करणाऱ्या एका शिक्षिकेचे अपवित्र कृत्य समोर आले आहे. मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील 40 वर्षीय इंग्रजी शिक्षिकेने शिक्षकी पेशाला काळिमा फासत तिच्याच 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचे वर्षभर लैंगिक शोषण केले.
या धक्कादायक प्रकरणात, पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. तसेच, या गुन्ह्यात मदत करणाऱ्या शिक्षकाच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शाळेतील इतर कोणत्या विद्यार्थ्यालाही लक्ष्य केले आहे का? याचा तपास पोलिस सध्या करत आहेत. शिक्षक आणि शिष्य यांच्यातील नात्याला लाजिरवाणा करणारी ही घटना पीडितेच्या पालकांना त्याच्या वागण्यात असामान्य बदल दिसला तेव्हा उघडकीस आली. त्यांनी त्याला उघडपणे बोलण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर किशोरने त्याची कहाणी सांगितली.
शिक्षीका विद्यार्थ्याला पंचतारांकित हाॅटेलमध्ये नेऊन अत्याचार करायची
आरोपी शिक्षीका विवाहित असून तीला दोन मुले आहेत. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत तसेच बाल न्याय व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभर या शिक्षिकेने 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या विद्यार्थ्याला कधी निर्जन स्थळी तसेच पंचतारांकित हाॅटेलमध्ये नेत त्याच्यासोबत अश्लील चाळे करून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यावर अद्याप शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही इंग्रजी विषयाची शिक्षिका असून पीडित विद्यार्थी अकरावीत असताना शिकवत होती. डिसेंबर 2023 साली झालेल्या वार्षिक शाळेच्या कार्यक्रमासाठी नृत्य गट स्थापन करण्यात आला होता. या गटात पीडित विद्यार्थी देखील होता. याच दरम्यान शिक्षिका या विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये या शिक्षिकेने या विद्यार्थ्याला लैंगिक हावभाव देखील दाखवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शिक्षिकेने या विद्यार्थ्याला निर्जनस्थळी नेत लैंगिक अत्याचार केले
पीडित मुलाला हे चांगले वाटले नाही म्हणून त्याने या शिक्षिकेला टाळण्यास सुरू केले. मुलगा आपल्याला टाळतोय असे लक्षात आल्यावर महिलेने तिच्या एका मैत्रिणीची मदत घेतली. या मैत्रिणीने मुलाला सांगितले की ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठी बनलेले आहात. त्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. शिक्षिकेने या विद्यार्थ्याला एका निर्जन स्थळी नेले व तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर विद्यार्थी तणावात राहायला लागला. तणावात राहू नये म्हणून या शिक्षिकेने त्याला काही औषध देण्यासही सुरू केले, असे तपासत समोर आले.
आरोपी शिक्षीका विद्यार्थ्याला दारू पाजायची
पोलिसांच्या तपासात असे देखील समोर आले की शिक्षिका या अल्पवयीन पीडित विद्यार्थ्याला दारू देखील पाजायची. कधी दक्षिण मुंबईतील तर कधी विमानतळाजवळ असलेल्या एक पंचतारांकित हाॅटेलमध्ये घेऊन जायची. तिथे त्याला जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायची. हे वारंवार सुरू झाल्यानंतर पीडित विद्यार्थी हा घरात व्यवस्थित वागत नव्हता. त्याच्या वागण्यात झालेला बदल त्याच्या पालकांच्या लक्षात आला. पालकांनी त्याला विश्वासात घेत विचारपूस केली तेव्हा त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून पालकांना धक्काच बसला. बारावीचे वर्ष असल्याने त्यांनी संयमाने घेत संबंधित शिक्षिकेला तंबी दिली. बारावी झाल्यावर विद्यार्थ्याने शाळा सोडली.
विद्यार्थ्याने शाळा सोडली तरी शिक्षिकेने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. शिक्षिकेने तिच्या घरातल्या एका कर्मचाऱ्याकडून पीडित विद्यार्थ्याशी संपर्क केला. पीडितेने शिक्षक आपल्याला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती घरी सांगितली. त्यानंतर घरच्यांनी शिक्षिकेच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलम 4 (लिंगभेदक लैंगिक अत्याचार), 6 (तीव्र लैंगिक अत्याचार) आणि 17 (गुन्ह्यांचे निर्मूलन) तसेच आयपीसी आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


