मुंबई : राज्यात वीज कोसळून जाणाऱ्या बळींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना केली. त्यावर सरकारने या प्रकरणी गांभिर्याने विचार करण्याची भूमिका घेतली. यावेळी महाराष्ट्रात 2022 व 2023 या 2 वर्षांत वीज पडून तब्बल 417 जणांचा बळी गेल्याची बाबही सरकारने नमूद केली. दरम्यान, वीज पडल्यामुळे कोंबडी पालकांचे होणाऱ्या नुकसानीत वाढ करण्याचेही संकेत सरकारने दिलेत.
वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना 25 लाख रुपयांची मदत केली जाते. पण वीज कोसळून मृत्यू झाल्याने केवळ 4 लाख रुपये दिले जातात. ही मदत पुरेशी नाही. त्यामुळे त्यात वाढ केली जावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. त्यावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्य आपत्ती व्यवस्थापनमध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता, पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार केला जाईल. याविषयीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
गिरीश महाजन यांनी यावेळी वीज पडून ठार होणाऱ्या प्राण्यांवर मिळणाऱ्या नुकसान भरपाईवरही भाष्य केले. ते म्हणाले, पूर्वी वीज पडून जी माणसे मरतात किंवा जे इतर नुकसान होते. त्याला मदत मिळत नव्हती. पण 2017 मध्ये सरकारने जीआर काढला. त्यानंतर याला मदत मिळण्यास सुरूवात झाली. त्यानुसार आता मृत व्यक्ती असेल तर 4 लाख, गंभीर जखमी असेल तर अडीच लाख रूपये दिले जातात. याशिवाय गाय, म्हैस, बैल या मोठ्या जनावरांना प्रत्येकी 37, 500 रुपये, शेळी, मेंढी असेल तर त्याला 4 हजार रुपये मिळतात. कोंबडीला केवळ 100 रुपयेच आहेत.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजही भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे सभागृहात पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. काल या प्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन झाले होते. त्यानंतर विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता.