भाची, जावई, मित्राच्या पुतण्याला शिक्षण संस्थेत
पद व नोकरीचे आमिष देवून, 1 कोटी 17 लाखांनी लुबाडले
का टा वृत्तसेवा
नागपूर : बहुचर्चित शालार्थ आयडी प्रकरण राज्यात गाजत असताना असेच एक प्रकरण पुढे आले. आरोपीने शिक्षण संस्थेत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच शिक्षकपदी नोकरीचे आमिष देत भाची, जावई आणि मित्राच्या पुतण्याची फसवणूक केली. त्यांच्याकडून एक कोटी २८ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. नीलकंठ दहीकर (६०), सविता दहीकर (५२) त्यांची मुलगी आशू (३०). पुतण्या राहुल धनोजी दहीकर (३५) आणि गुलाब धोंडबा दहीकर (४५) सर्व रा. वडसा (गडचिरोली) अशी आरोपींची नावे आहेत.

मानेवाडा येथील रहिवासी फिर्यादी भारती हरखंडे (५०) यांच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा शिक्षण संस्थाचालक आहे. शांतिवन दिव्यांग निराधार आदिवासी विकास शिक्षण संस्था (देसाईगंज, वडसा) आणि मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार एज्युकेशन सोसापटी (ब्रह्मपुरी) अशा दोन शिक्षण संस्था आहेत.
फिर्यादी ही आरोपीच्या बहिणीची मुलगी आहे. २०११ पासून हे प्रकरण सुरू आहे. नीलकंठ आणि त्याच्या पत्नीने भारतीला त्यांच्या वडसा येधील शिक्षण संस्थेत अध्यक्षपदी नियुक्ती देण्याची बतावणी केली. त्यांच्याकडून ४८ लाख रुपये घेतले. तसेच भारतीचा पती संजय यांना ब्रह्मपुरीच्या शिक्षण संस्थेत उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यासाठी ३० लाख रुपये घेतले. त्याचप्रमाणे दुसऱ्या भाचीला शिक्षण संस्थेत नोकरी देण्यासाठी ४५ लाख रुपये, तर मित्राच्या पुतण्याला शिक्षण संस्थेत नोकरीसाठी १५ लाख रुपये घेतले.