बिहारमध्ये मतदार यादीवरून विरोधकांचा हल्ला;
शक्तिप्रदर्शन : चक्का जाम, महाआघाडीचे नेते रस्त्यावर उतरले
पाटणा/नवी दिल्ली : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण विरोधात (एसआयआर) बुधवारी विरोधी पक्षांनी राज्यभर निदर्शने केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह आघाडीचे विरोधी पक्षनेते पाटण्यातील निषेधात सहभागी झाले. विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सुरू केलेली ही प्रक्रिया ‘मोठ्या संख्येने मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवेल,’ ज्याचा सत्ताधारी एनडीएला फायदा होईल.
राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये बंदचा परिणाम दिसून आला. अनेक शहरांमध्ये रेल्वे ट्रॅक आणि महामार्ग ठप्प झाले होते. काही स्थानकांवर गाड्या रोखल्या होत्या. पाटण्यामध्ये राहुल यांच्यासोबत सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, सीपीआय (एम) सरचिटणीस एमए बेबी आणि सीपीआय (एमएल) सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य होते, ज्यांनी राज्य निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढला. तथापि, त्यांना कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही.
‘मजबूत लोकशाहीसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक’ : मुख्य निवडणूक आयुक्त
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, ‘मजबूत लोकशाहीसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे. बिहारमध्ये आतापर्यंत ५७% पेक्षा जास्त अर्ज जमा झाले आहेत. आयोग नेहमीच मतदारांसोबत उभा राहिला आहे, आणि पुढेही राहील.
बिहारच्या तरुणांच्या मतांचीच चोरी
त्यांच्या भविष्याची आणि हक्कांची चोरी : पद्धत नवीन, पण कट जुना आहे
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र निवडणुकीत गडबडीचा आरोप केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात जनादेश हिसकावून घेतला. निवडणूक चोरली. बिहारमध्येही तोच प्रयत्न होत आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला महाराष्ट्र मॉडेलची माहिती मिळाली. म्हणूनच त्यांनी नवीन मॉडेल आणले आहे. पद्धत नवीन, पण कट जुना आहे. निवडणूक आयुक्त हे विसरले की ते कोणत्याही पक्षाचे नाही तर देशाचे आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला (आयोग) जे काही करायचे ते करा, कायदा तुम्हाला लागू होईल. तुम्ही कितीही मोठे असलात, कुठेही बसलात तरी मी तुम्हाला हमी देतो की कायदा तुम्हाला सोडणार नाही. राहुल म्हणाले, ही केवळ बिहारच्या तरुणांच्या मतांची चोरी नाही, तर ही त्यांच्या भविष्याची आणि हक्कांची चोरी आहे
विरोधकांना यादीत घुसखोरांचा समावेश करायचा का? : भाजप
भाजप आणि जेडीयूने विरोधकांच्या बंदला प्रत्युत्तर दिले. भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले, विरोधकांना मतदार यादीत घुसखोरांचा समावेश करायचा आहे का? त्यांना बेकायदेशीर मतदारांसोबत राजकारण करायचे आहे का? रोहिंगे व इतरांची चुकीच्या मार्गाने मतदार यादीत नावे येतात.
पप्पू यादव आणि कन्हैया यांना व्यासपीठावर चढण्यापासून रोखणे कटाचा भाग ?
पप्पू यादव आणि कन्हैया यांना राहुल गांधींच्या ट्रकमध्ये चढण्यापासून रोखले : बंद दरम्यान, अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी भाषणासाठी बनवलेल्या तात्पुरत्या व्यासपीठावर दोनदा चढण्याचा प्रयत्न केला. तथापि, दोन्ही वेळा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यांच्या आधी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना व्यासपीठावर चढण्यापासून रोखण्यात आले. राहुल गांधींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन्ही नेत्यांना ढकलले आणि ट्रकमध्ये चढू दिले नाही.
परंतू पप्पू यादव आणि कन्हैया कुमार यांना राहुल गांधींच्या ट्रकमध्ये चढण्यापासून रोखले, असे काहीही घडले नसल्याचा स्पष्ट शब्दात पप्पू यादव आणि कन्हैया कुमार यांनी इंकार केला आहे. विरोधक जाणिवपुर्वक अपप्रचार करत असल्याचे दोघांनीही स्पष्ट केले आहे.