August 15, 2025 6:03 am

स्वतःच्या घराच्या स्वप्नपूर्ती साठी पात्र लाभार्थ्यांना सावनेर-कळमेश्वरात भूखंडांचेे वाटप

‘शासनाच्या योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे’ : आ. डॉ. आशिष देशमुख

का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
सावनेर/कळमेश्वर : अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यातील शेकडो गरजू नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना 08.08.2025 ला अधिकृतपणे भूखंडांचे पट्टे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामुळे अनेकांच्या जीवनात आनंदाचा क्षण आला.
                       हा सोहळा केवळ एक सरकारी कार्यक्रम न राहता, अनेक कुटुंबांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरला. पट्टे मिळाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते. ‘आता आमचे स्वतःचे घर होईल,’ अशा भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. या उपक्रमाने ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.

                       आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “शासनाच्या योजनांचा खरा लाभ गरजूपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला त्याचा हक्क सन्मानाने मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. ही केवळ एक कागदी नोंद नाही, तर तुमच्या भविष्याची आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी आहे.”
                       हा महत्त्वपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, भाजपा जिल्हा मुख्यालय प्रभारी इमेश्वर यावलकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, सावनेरचे तहसीलदार अक्षय पोयम आणि कळमेश्वरचे तहसीलदार विकास बिक्कड, सावनेरचे गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर व अंशुजा गराटे, गटविकास अधिकारी, कळमेश्वर यांचा समावेश होता. याशिवाय, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                      या पट्टे वाटपामुळे ग्रामीण भागातील विकासाला गती लाभार्थ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण होइल, अशी आशा व्यक्त आमदार डॉ. आशिष देशमुख  यांनी व्यक्त  केली आहे. स्वतःच्या मालकीची जागा मिळाल्याने अनेक गरीब कुटुंबांना आता घरकुल योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News