February 7, 2026 9:57 am

‘छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी दृष्टीकोन’

समतेचा मूळ स्रोत तथागत गौतम बुद्ध – डॉ. अनिल बैसाने

अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राची व्याख्यानमाला‎

अमरावती : समतेचा मूळ स्रोत तथागत गौतम बुद्धच आहेत आणि संत कबीर, संत तुकाराम महाराज यांच्यावरही तथागत गौतम बुद्धाच्याच विचारांचा प्रभाव होता. एवढेच नव्हे, तर विदेशातील मोठमोठ्या ज्ञानवंतांनी जो समतेचा संदेश दिला, तो सुद्धा बुद्धाच्या विचारसणीचाच भाग आहे. मात्र, भारतातील गौतम बुद्धांच्या समतेचे रोपण विदेशात झाले आणि भारताने पुन्हा विदेशातून समतेचे रोपटे आपल्या देशात रुजवले, असे प्रतिपादन धुळे येथील व्याख्याते प्राचार्य डॉ. अनिल बैसाने यांनी केले.

                         संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी दृष्टीकोन’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलकुरू डॉ. महेंद्र ढोरे, डॉ. भैयासाहेब मेटकर, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.
                           डॉ. भैयासाहेब मेटकर म्हणाले, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्देशही एकच होता. सयाजीराव गायकवाड यांनी छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेशात शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेत आहे, असे सांगितले, तेव्हा शाहू महाराजांनाही खूप आनंद झाला आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली.
                        त्यांची मुंबई येथे स्वत: भेट घेऊन कोल्हापूर संस्थानात बोलावले व जरीपटका बांधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला. एवढेच नाही, तर १९२० मध्ये झालेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपदही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले, असेही डॉ. भैयासाहेब मेटकर यांनी सांगितले. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, समता ही बुद्ध तत्वज्ञानातून मिळते. राजश्री शाहू महाराज खऱ्या अर्थाने चॅरिटी बीईंग ऑफ होम असे म्हणून ते उपभोगशून्य स्वामी होते, असे प्र-कुलगुरू डॉ. ढोरे म्हणाले.
                           प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड यांनी, सूत्रसंचालन डॉ. रत्नशील खोब्रागडे यांनी केले, तर आभार रघू राळे यांनी मानले. व्याख्यानाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News