February 7, 2026 4:03 pm

ही मराठ्यांची शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच परतू : जरांगे

29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन, 27 ला आंतरवालीतून कूच

‘आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही’,

‘मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर, महाराष्ट्रात एकाही भाजप आमदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही’ : जरांगे

बीड : मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राजकारण्यांचे ऐकून घरी थांबू नका, प्रत्येकाने मुंबईला या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रात एकाही भाजप आमदाराला रस्त्यावर फिरू द्यायचे नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
                       आंदोलनासाठी २७ तारखेला सकाळी आपल्याला जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून एकत्र निघायचे आहे आणि २९ तारखेला शांततेत मुंबईमध्ये जायचे आहे, असे बैठकीत जरांगे यांनी आंदोलकांना सांगितले. या वेळी एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. राजकीय नेत्यांचे ऐकून घरी थांबू नका. सरकारने आरक्षण दिले, मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळू असेही त्यांनी नमूद केले. मी मरणापर्यंत येऊन टेकलोय, उपाशा-तापाशी राहतो, रक्त जाळतो पण एक इंचही मागे सरकत नाही. तुमच्या लेकरांसाठी लढतोय. आरक्षणासाठी आता ही शेवटची लढाई आहे. मी मरण्याला घाबरत नाही. आता माघार नाही. आरक्षण घेऊनच परत यायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
File Photo
File Photo
                        मुंबईला सर्वांनी शांततेत जायचे आहे. मला जाळपोळ, दगडफेक मान्य नाही. मी तुम्हाला शांततेत आरक्षण मिळवून देतो. मला समाजातील एकही लेकरू वाया जाऊ द्यायचे नाही. जाळपोळ करणारे आपली पैदास नाही, लक्षात ठेवा. सरकार कारस्थान करून असे लोक आपल्यात घालतील. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील. दगड हाणा म्हणतील. पण दगडफेक झाली तरी सरळ चालायचे. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल उधळायचा. मागे फिरायचे नाही, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. मुंबईला येताना तुम्ही कुणावरही अवलंबून राहू नका, पीठ-मीठ घेऊन या. पाऊस असल्याने छत्र्याही घेऊन या, असेही जरांगेनी आंदोलकांना सांगितले.

सगेसोयऱ्यांनाही आरक्षण मिळावे

                         मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांसाठीही आरक्षण लागू व्हावे. सातारा व हैदराबादचे गॅझेट लागू करावे. ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया करावी यासह इतर मागण्यांसाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचे आंदोलन होणार आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यांतून जरांगे समर्थक मुंबईत पोहोचणार आहेत.

मुंबईत ४० हजार पोलिसांची तैनाती, डीजेबंदीवरुन एसपी, डीवायएसपींना इशारा

                        मुंबईत गणेशोत्सवासोबतच मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३५ ते ४० हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. ४,५०० पेक्षा जास्त वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत ठेवतील आणि शहरातील ९,००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाईल. बीडच्या इशारा सभेत डीजे वाजवू दिला नसल्याने मनोज जरांगे चांगलेच संतापले. ते म्हणाले, आमचा डीजे वाजवू दिला नाही. यापुढे बीडमध्ये कोणाचाही डीजे वाजवू देणार नाही. सत्तेचा वापर करून आम्हाला डीजे वाजवू दिला गेला नाही. आता आम्हाला नडणाऱ्या पोलिसांचा बाजार उठवायला मला वेळ लागणार नाही.
File Photo
File Photo

फडणवीस मराठा-ओबीसी भांडण लावताहेत

                         जरांगे म्हणाले की, फडणवीस हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. तुमच्या एका चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डाग लागू शकतो. तुमची कारकीर्द उद्ध्वस्त झाली म्हणून समजा. आता तुमच्यावर पश्चात्तापाचा दिवस येऊ देऊ नका. अडथळे निर्माण करून मराठा समाजाला भडकावू नका. आमच्यावर वार करायचे थांबवा. फडणवीस यांनी पोलिसांचा वापर करून आम्हाला त्रास देऊ नये.

आरक्षण दिले, लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यास समजून घेऊ : फडणवीस

                        आमच्या सरकारनेच मराठा समाजाला १०% आरक्षण दिले. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही आम्ही दीड लाख मराठा उद्योजक तयार केले. पुढेही समाजासाठी काम करणार, पण लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.’
File Photo
File Photo

बैठकीसाठी मनाेज जरांगेंना आमदारांकडून १०-१५ लाख रुपये : हाके

                        जरांगे यांचा मोर्चा सरकार पुरस्कृत असून प्रत्येक बैठकीसाठी आमदार त्यांना १० ते १५ लाख रुपये देत अाहेत. यामुळेच गावा-गावात जरांगेंची पोस्टर्स लागत आहेत. आरक्षणाद्वारे मराठा समाजाला ही व्यवस्था हाती घ्यायची आहे, नोकरशाहीत आपले लोक घुसवायचे असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.’

0
0

Leave a Reply

Realted News