December 1, 2025 7:30 am

कळमेश्वर तालुक्यात 3 तास तुफानी वादळी पावसाचा कहर

कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी, दाढेरा, सालई, नांदागोमुख, उमरी

परिसरात 3 तास तुफानी वादळी पावसाचा कहर

काटा वृत्तसेवा I प्रविण अडागळे
कळमेश्वर : कळमेश्वरच्या वायव्येस (उत्तर- पश्चिमेस) पंचवीस किलोमीटरवर तेलकामठी महसूल मंडळातील तिडंगी, दाढेरा, नांदा गोमुख, सावळी, उमरी, तेलगाव, तेलकामठी सह अनेक गावांना आज दि. 26  ला अंदाजे साडेतीन ते सहा पर्यंत झालेल्या तुफानी, वादळी व मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

या तुफानी वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची शेकडो संत्रा, मोसंबी, चंदनाची झाडे मुळासकट उपटून काढली असून झाडावरच्या संत्रा फळासहित मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोसंबी, संत्रा फळझाडांचे शेकडो हेक्टर मधील तसेच कापूस तूर, सोयाबीन व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झालेले आहे. रात्र झाल्याने अद्याप जनावरे किंवा अन्य जीवित हानी झाल्याचे निदर्शनात आलेले नसले तरीे, तुफानी वादळी व मुसळधार पावसाची तीव्रता व इतकी होती भयंकर कडाडणाऱ्या विजासहित मुसळधार पावसामुळे कुणीही घराच्या बाहेर निघण्याची हिंमत केली नाही.

                          अंदाजे तीन तास पर्यंत चाललेल्या या भयंकर धुंवाधार पावसाने काय कहर केला? हे उद्याच स्पष्ट होइल. रात्र झाल्याने कुणाचे किती नुकसान झाले याचा अंदाज येणे आता शक्य नाही. तिडंगीचे सरपंच रामभाऊ मारबते यांचेशी फोनवरून मिळालेल्या माहितीप्रमाणे तिडंगीला लागूनच असलेला कोलार तलाव हा 60 ते 65 सेंटिमीटर ने ओव्हर फ्लो होऊन ओसंडून वाहात आहे. यात महत्वाचे म्हणजे तलावाचा कंत्राट असलेल्या मच्छीद्रनाथ मच्छीमार संस्थेच्या 9 बोटी व अंदाजे 300 किलो मासे पकडण्याचे जाळे वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे संस्थेचे अंदाजे साडेतीन-चार लाखाचे नुकसान झाले आहे.

                           याच महिन्यात सहा सप्टेंबरला अंदाजे दोन ते अडीच लाखाचे या कोलार तलावात टाकलेले मत्स्यबीज व विक्रीस तयार अंदाजे 4 टन मोठे मासे सुद्धा ओव्हर फ्लो झालेल्या पाण्याने वाहून गेले आहे. त्यामुळे संस्थेचे अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचे एकूण नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

त्याचप्रमाणे परिसरातील नऊ ते दहा हजार लोकसंख्या प्रत्यक्षपणे प्रभावित झाली असून नागरिकांच्या घरांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाला संत्रा, मोसंबी ची बहरलेली झाडे पावसाने पार उपटून टाकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे कळते. या भयंकर तुफानी पावसाने परिसरातील नऊ-दहा हजारा पेक्षा जास्त लोकसंख्या प्रभावीत झाली असून किती नुकसान झाले रात्र झाल्याने शक्य नाही.

                           बातमी लिहीस्तोवर तलाठ्यापासून त्यावरचा कोणताही शासकीय अधिकारी अद्याप पर्यंत घटनास्थळावर पोहोचलेला नसल्याची माहिती प्राप्त झाली, असून फक्त विद्युत मंडळाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे कळते. तसेच यावेळी बोलताना तिडंगी दाढेरा ग्रामपंचायतीचे सरपंच रामभाऊ मारबते यांनी शासनाने तात्काळ परिसरातील नुकसान भरपाईचा पंचनामा करून नागरिकांना, शेतकऱ्यांना व मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News