February 7, 2026 8:50 am

सरन्यायाधीशांवर माथेफिरू वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल नाही

प्रतिष्ठेवर हल्ला : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अशी पहिली घटना

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी ११:३५ वाजता एक धक्कादायक घटना घडली. न्यायालयीन कामकाजा- दरम्यान ७१ वर्षीय माथेफिरू वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने अस्वस्थ न होता सरन्यायाधीशांनी वकिलांना सांगितले, “या सर्व गोष्टींनी अस्वस्थ होऊ नका. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.

                         प्रत्यक्षदर्शी वकिलांच्या म्हणण्यानुसार सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांचे खंडपीठ खटल्याची सुनावणी करत असताना वकील राकेश किशोर पीठाजवळ आला. त्याने त्याचा स्पोर्ट‌्स बूट काढून न्यायाधीशांवर फेकण्यास सुरुवात केली.
                           सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले बाहेर काढताना त्याने ओरडून सांगितले, “आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” नंतर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आवारात सोडले. कोर्टरूममध्ये उपस्थित वकील अनस तन्वीर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, दिल्लीतील मयूर विहार येथील रहिवासी असलेला हल्लेखोर वकिलाचा गणवेश परिधान केलेला होता.
                         त्याच्याकडे प्रॉक्सिमिटी कार्ड आणि कागदपत्रांचे बंडल असलेली बॅग होती. त्याने सरन्यायाधीशांसोबत बसलेल्या न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांची माफी मागितली. हा हल्ला फक्त सरन्यायाधीश गवई यांच्यावरच होता असे स्पष्ट केले. या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलने राकेश किशोर याचा परवाना तात्काळ निलंबित केला. राकेश २०११ पासून बार कौन्सिलचे सदस्य होता.

खंडपीठ वकील संघातर्फे आज लाल फीत लावून काम

                         या खेदजनक घटनेचा औरंगाबाद खंडपीठाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. वकील संघाच्या सभेत घटनेबद्दल खेद व्यक्त केला. मंगळवारी खंडपीठात वकील लाल फिती लावून कामात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा फोन, धैर्य दाखवल्याबद्दल प्रशंसा

                         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश गवईंना फोन करून त्यांची धैर्याबद्दल प्रशंसा केली. ते म्हणाले, सरन्यायाधीशांवरील हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. यातून न्यायासाठी त्यांची कटिबद्धता दिसून येते.

भगवान विष्णूंबद्दल सरन्यायाधीशांच्या वक्तव्याने नाराज : माथेफिरू वकिलाची कबुली

                         चौकशीदरम्यान, आरोपी वकील राकेश किशोर याने कबूल केले की तो भगवान विष्णूंबद्दल सरन्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे नाराज झाले होता. १६ सप्टेंबर रोजी, मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या खंडित मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळताना, सरन्यायाधीश म्हणाले होते, “जा आणि देवालाच काहीतरी करण्यास सांगा. जर तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असाल, तर प्रार्थना आणि ध्यान करा.” सरन्यायाधीशांनी असेही म्हटले की, “ही याचिका प्रसिद्धी मिळविण्यासाठी दाखल केली आहे.” नंतर, सोशल मीडियावरील टीकेला उत्तर देताना, ‘आपण सर्व धर्मांचा आदर करताे,’ असे सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले हाेते.

या आधी बूट फेकल्याच्या घटना

                             पी.चिदंबरम (२००९), मनमोहन सिंग (२००९), अडवाणी (२००९), ओमर अब्दुल्ला (२०१०), राहुल गांधी (२०१२), नितीन गडकरी (२०१४), अरविंद केजरीवाल (२०१६) यांच्यावरही बूट फेकण्यात आले.

 

0
0

Leave a Reply

Realted News