February 7, 2026 1:28 pm

Nagpur : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूरमध्ये आगीचे तांडव

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूरमध्ये आगीचे तांडव

रिलायन्स मॉल भस्मसात, कोट्यवधींचे नुकसान

का टा वृत्तसेवा I
नागपूर | प्रतिनिधी : लक्ष्मीपूजनाच्या मंगल दिवशी नागपूरकरांना आगीच्या भीषण घटनांचा सामना करावा लागला. दिवसभरात शहरात एकूण १७ ठिकाणी आगी लागल्याचे कॉल्स अग्निशमन विभागाला प्राप्त झाले. यातील सात आगी फटाक्यांमुळे लागल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. सर्वात गंभीर घटना लक्ष्मीनगर परिसरातील रिलायन्स मॉलमध्ये घडली, जिथे भीषण आग लागून संपूर्ण मॉल भस्मसात झाला आहे.

रिलायन्स मॉलमध्ये कोट्यवधींचे नुकसान

                         मंगळवारी रात्री सुमारास, आठ रस्ता चौकाजवळ असलेल्या रिलायन्स मॉलमध्ये अचानक आग लागली. प्रत्यक्षदर्शींनुसार, लोक फटाके फोडत असताना एक फटाका मॉलमध्ये जाऊन पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीनिमित्त मॉल सायंकाळी लवकर बंद करण्यात आला होता.
                         सुरुवातीला आग मॉलच्या तळमजल्यावरील दुकानांमध्ये लागली. काही मिनिटांतच ती दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर पसरली. संपूर्ण इमारत धडधडून पेटली. स्थानिक नागरिकांनी फायर ब्रिगेडला संपर्क साधला, मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.
                         तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मॉलमधील वाणसामान, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्र, फर्निचर आदी सर्व साहित्य जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शहरभरात आगीच्या इतर घटना

रिलायन्स मॉलव्यतिरिक्त नागपूरच्या विविध भागांमध्ये आगीच्या घटनांची नोंद झाली:
  • गणेशपेठमधील बाजार समिती कार्यालय
  • गणेशपेठ पोलिस ठाण्यासमोर पार्क केलेली एक कार
  • ओंकार नगर ते बेसा रोड दरम्यान नाल्याजवळील नर्सरी
  • जरीपटका परिसरात कचऱ्याच्या ढिगाला लागलेली आग
  • अयोध्या नगर, राम मंदिर रोडवरील डॉ. बोनरा यांचे घर
  • तथागत चौकातील झोपडपट्टी
  • जरीपटका चौकात रॉकेट लागून झाडाला लागलेली आग
  • दक्षिणा मूर्ती चौक व महाल परिसरातील घरे
                         सर्व ठिकाणी फायर ब्रिगेडने वेळीच हस्तक्षेप करत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समजते.
                        या घटना लक्षात घेता फटाक्यांमुळे होणाऱ्या धोक्यांविषयी चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. नागपूर महापालिका आणि अग्निशमन विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रिलायन्स मॉलमधील आगीची सखोल चौकशी करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

 

0
0

Leave a Reply

Realted News