हिवाळी अधिवेशन ‘वांझोटे’ ठरले – विरोधकांचा घणाघात
का टा वृत्तसेवा | विशेष प्रतिनिधी
नागपूर येथे पार पडलेल्या सात दिवसीय हिवाळी अधिवेशनातून शेतकरी, विदर्भ आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी काहीही न पडल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अधिवेशन समाप्तीनंतर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर घोषणाबाजी, दुर्लक्ष आणि निष्क्रियतेचे आरोप केले.
‘विदर्भासाठी एकही ठोस घोषणा नाही’ – भास्कर जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले की, हे अधिवेशन केवळ निवडणुकीच्या तयारीसाठी आणि सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्यासाठी घेण्यात आले. “ज्या घोषणा करण्यात आल्या त्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईपुरत्याच मर्यादित होत्या. विदर्भासाठी मात्र एकही ठोस घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे हे अधिवेशन विदर्भाच्या जनतेची सरळसरळ फसवणूक आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
भ्रष्टाचारावर प्रश्न, पण कारवाई शून्य – सचिन अहिर
सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, अशी टीका सचिन अहिर यांनी केली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे अधिवेशन पार पाडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
![]()
शेतकरी आणि तरुणांची घोर निराशा – वडेट्टीवार
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, विदर्भातील धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अपेक्षेने अधिवेशनाकडे पाहत होते. “धान आणि सोयाबीनला बोनस द्यावा, अशी मागणी केली. मात्र सरकारकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही. राज्यातील तरुण ड्रगच्या विळख्यात अडकत असताना, त्यावर ठोस कारवाईची भूमिका सरकारकडे नाही,” अशी गंभीर टीका त्यांनी केली.
‘पैसे नाहीत, पण घोषणा अपार’ – सतेज पाटील
काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सरकारवर बोचरी टीका करताना सांगितले की, या अधिवेशनात केवळ घोषणांचा मारा झाला. “कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी करूनही कोणताही निर्णय झाला नाही. खिशात पैसे नाहीत, पण घोषणा मात्र अमाप आहेत. इतक्या घोषणा करण्यात आल्या की त्यासाठीचे बजेटही कमी पडेल,” असा टोला त्यांनी लगावला.
![]()
गुंतवणुकीच्या घोषणा, पण प्रत्यक्षात उद्योग नाहीत – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारच्या गुंतवणूक दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सभागृहात एमओयू झाल्याचे सांगण्यात आले, पण ज्यांच्याशी करार झाले त्या कंपन्या राज्यात येताना दिसत नाहीत. प्रत्यक्षात गुंतवणूकच झाली नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न तसाच कायम आहे,” असा आरोप त्यांनी केला.
कायदा-सुव्यवस्थेवर ठोस उत्तर नाही
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, मात्र सरकारकडून ठोस उत्तरे मिळाली नाहीत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. शशिकांत शिंदे यांनीही सभागृहात प्रश्न उपस्थित करूनही सत्ताधाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असे सांगितले.
सात दिवसांचे अधिवेशन, पण जनतेच्या पदरी निराशा
विरोधकांच्या मते, सात दिवस चाललेल्या या हिवाळी अधिवेशनातून जनतेला दिलासा देणारा एकही ठोस निर्णय निघाला नाही. शेतकरी, तरुण आणि विदर्भातील नागरिकांच्या अपेक्षा भंग पावल्याने हे अधिवेशन ‘वांझोटे’ ठरल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे.