February 7, 2026 9:57 am

छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. चुकीच्या खोलीचे दार ठोठावल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील तिघांनी महिलेला आत ओढून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. वेदांतनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तिन्ही संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. पैशांच्या गरजेपोटी तिने भोकरदन येथील मित्राशी संपर्क साधला होता. त्यानुसार ती बुधवारी रात्री स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये गेली होती. संबंधित मित्राने १०५ क्रमांकाची खोली बुक केली होती. रात्री सुमारे ११ वाजता फोनवर बोलण्यासाठी ती बाहेर गेली होती. परतताना चुकून तिने १०५ ऐवजी २०५ क्रमांकाच्या खोलीचे दार ठोठावले.

त्या खोलीत घनश्याम भाऊलाल राठोड (२७), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (२५) आणि किरण लक्ष्मण राठोड (२५) हे तिघे मद्यपान करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपानुसार, त्यांनी महिलेला जबरदस्तीने खोलीत नेऊन दार बंद केले, बळजबरीने मद्य पाजले आणि तिच्यावर अत्याचार केला. पहाटे ३ ते ४ दरम्यान संधी साधून पीडिता बाहेर पडली व आरडाओरड केली. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. हॉटेल बुकिंगची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जिन्सी, मोंढा आणि भानुदासनगर परिसरातून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी अविवाहित असून दोघे फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतात, तर एक खाजगी काम करत असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

0
0

Leave a Reply

Realted News