मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख; महिला पोलिसाची फसवणूक व लैंगिक अत्याचाराचा आरोप
नागपूर | प्रतिनिधी
नागपूरमध्ये मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर एका विवाहित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणाने अश्लील फोटो व व्हिडीओच्या धमकीद्वारे पीडितेकडून सुमारे १५ लाख ६० हजार रुपये उकळल्याचा आरोप असून, याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय २५) ही पोलीस अंमलदार असून तिची ओळख एका नामांकित मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून आरोपी विकिन सूर्यभान फुलारे (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा) याच्याशी झाली होती. आरोपीने स्वतःला अविवाहित वकील म्हणून सादर करत खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे.
प्रारंभी चॅटिंग व व्हिडीओ कॉल्सद्वारे संवाद सुरू झाला. त्यानंतर आरोपीने लग्नाची इच्छा दर्शवून पीडितेचा विश्वास संपादन केला. ओळख दृढ झाल्यानंतर तो नागपूरला आला. २८ नोव्हेंबर रोजी आरोपीने महिलेला लग्नाची मागणी घालत एका लॉजवर नेले, जिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, या काळात आरोपीने महिलेचे काही फोटो व व्हिडीओ चोरट्या पद्धतीने काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला मानसिक दबावाखाली ठेवले. या दबावाचा फायदा घेत आरोपीने फर्निचर खरेदी, वैयक्तिक अडचणी व इतर कारणे सांगत वेळोवेळी मोठी रक्कम घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पीडितेने लग्नाचा आग्रह धरल्यानंतर आरोपीने तिला जिवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत आहे. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेऊन पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.