१,९७२ बनावट शालार्थ आयडीद्वारे १५० कोटींची फसवणूक;
अंतिम चौकशी अहवाल २ जानेवारीला
नागपूर : नागपूर विभागाला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा अंतिम प्रशासकीय चौकशी अहवाल अखेर सादर होणार आहे. शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी हा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक तथा चौकशी अधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घोटाळ्यात प्रमुख १३ आरोपींनी तब्बल १,९७२ बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
महेश पालकर यांनी जून २०२५ अखेरीस अंतरिम अहवाल सादर केला होता. त्यानंतर मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण देत अंतिम अहवाल सादर करण्यास विलंब होत राहिला. मात्र आता सर्व संबंधित फाईल्सची तपासणी पूर्ण झाली असून अहवाल तयार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्यानंतर तो २ जानेवारी रोजी सादर केला जाणार असल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या सहा महिन्यांपासून अंतिम अहवाल रखडल्याने चौकशीची गती मंदावली होती. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अहवाल सादर होत असल्याने या प्रकरणातील पुढील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.
![]()
संस्थाचालकांनी पैसे घेतल्याची पाच शिक्षकांची कबुली
या घोटाळ्यात मोहपा येथील विठ्ठल रुख्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजपचे माजी पंचायत समिती अध्यक्ष दिलीप धोटे यांच्या अटकेनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. धोटेंनंतर इतर शिक्षण संस्था चालकांना वाचवण्यासाठी ‘अदृश्य हात’ कार्यरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आतापर्यंत पाच शिक्षकांनी संस्थाचालकांनी पैसे घेतल्याची कबुली दिली असून, काही संस्थाचालकांनीही या घोटाळ्यासाठी यंत्रणा फिरवल्याची माहिती आहे. मात्र धोटेंनंतर अद्याप एकाही शिक्षण संस्थाचालकाला अटक झालेली नाही.
दरम्यान, काही आरोपी शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना अटक व चौकशीपासून तात्पुरते संरक्षण मिळाले आहे.
![]()
या आरोपींनी तयार केले सर्वाधिक बनावट शालार्थ आयडी
नीलेश वाघमारे – ६८०
चिंतामन वंजारी – २५३
रोहिणी कुंभार – २४४
वैशाली जामदार – २११
उल्हास नरड – १८७
सिद्धेश्वर काळुसे – १५४
सतीश मेंढे – ८३
अनिल पारधी – ८१
गौतम गेडाम – ४०
रवींद्र काटोलकर – ३९
२६ आरोपींविरोधात दोषारोपपत्र, ६७३ शिक्षकांचे पगार काढले
या प्रकरणात आतापर्यंत २६ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून ६७३ शिक्षकांचे पगार काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या सहीचा वापर करूनही बनावट आयडी तयार करण्यात आले. मात्र यासंदर्भातील संपूर्ण फाईल शिक्षण विभागातून गहाळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी
या घोटाळ्यात आतापर्यंत
४ विभागीय शिक्षण उपसंचालक
४ शिक्षणाधिकारी
४ लिपिक
३ शाळा मुख्याध्यापक
२ शाळा संचालक
८ सहायक शिक्षक
१ वेतन अधीक्षक
असे एकूण २६ आरोपी अटक करण्यात आले असून, यातील बहुतांश आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.
शालार्थ आयडी घोटाळ्याचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता असून, या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
![]()