मूलबाळ नसल्याच्या कारणावरून पत्नीचा खून

मूलबाळ नसल्याच्या कारणावरून पत्नीचा खून;

पतीने पोलिस ठाण्यात जाऊन दिली कबुली

पुणे : पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरात धक्कादायक घटना घडली असून, मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस चौकीत हजर झाला. फुरसुंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मृत महिलेचे नाव प्रियांका आकाश दोडके (वय २७, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे असून आरोपी पती आकाश विष्णू दोडके (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी प्रियांकाचा भाऊ सागर रामदास अडागळे (वय ३५, रा. नानगाव, ता. दौंड) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश आणि प्रियांका यांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. आकाश खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. लग्नानंतर त्यांना मूलबाळ होत नसल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. गेल्या काही दिवसांपासून आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या संशयातून त्यांच्यात अनेकदा भांडणे आणि मारहाणीचे प्रकार घडत होते.

शुक्रवारी (२६ डिसेंबर) रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. या वादातून आरोपीने प्रियांकाला मारहाण करत तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेनंतर प्रियांका बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच आकाश थेट पोलिस चौकीत गेला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रियांकाला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आरोपी आकाश दोडके याला अटक केली असून, सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव पुढील तपास करत आहेत.

0
0

Leave a Reply

Realted News